सावरगाव येथे दुपारच्या वेळी वयोवृद्ध महिलेच्या घरात घुसून मारहाण करीत सोन्याचे मंगळसूत्र हिसकावणारा चोरटा जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
1 min read
जुन्नर दि.२९:- जुन्नर पोलीस स्टेशन हद्दीत दि. २२/४/२०२६ रोजी फिर्यादी कल्पना बाजीराव राजगुरू (वय 62 वर्ष राहणार सावरगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे) च्या दुपारच्या वेळी घरी असताना एका अज्ञात इसमाने त्यांच्यावर हल्ला करून त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून नेले होते.
तसेच त्यांना जबर मारहाण करून तोंडात दगड कोंबून त्यांचे चार दात पाडले होते. त्यावरून जुन्नर पोस्ट येथे गुन्हा रजिस्टर नंबर ११०/२०२६ भारतीय २०२३ चे ३०९(६) प्रमाणे गुन्हा दाखल केला होता. वयोवृद्ध महिले सोबत झालेल्या सदरच्या प्रकाराचे गांभीर्य लक्षात घेत माननीय पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण संदीप सिंह गिल्ल यांनी सदर
गुन्ह्याचा लवकरात लवकर तपास करून आरोपींना अटक करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दिल्या होत्या. सदर गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेमार्फत समांतर तपास करत असताना सावरगाव जुन्नर येथील घटना स्थळाच्या आजूबाजूला सीसीटीव्ही फुटेज चेक केले असता एक संशयित इसम मोटरसायकलवर जाताना दिसून आला.
पण थोडा पुढे नारायणगावच्या बाजूला गेल्यानंतर आरोपीने गुन्हा करते वेळी घातलेली कपडे पोलिसांना चकवा देण्यासाठी बदलून दुसरी कपडे परिधान केली. आरोपीने पोलिसांना चकवा देण्या करिता अनेक वेळा रस्ता बदलला, कपडे बदलले पण त्यानंतर देखील गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळापासून त्या संशयित इसमाचा मागोवा काढत
भोसरीपर्यंत CCTV फुटेज प्राप्त केले.मिळालेले सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयतीत इसमाचे तसेच त्याने वापरलेल्या गाडीची गोपनीय बातमीदारा मार्फत माहिती घेतली असता सदर संशयित इसम हा रवींद्र गणपत राजगुरू वय ५४ सध्या राहणार भोसरी,
पिंपरी चिंचवड मूळ राहणार सावरगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे असल्याचे समजले. दिनांक २८/४/२०२६ रोजी संशयित इसम हा घोडेगाव फाटा जुन्नर येथे येणार असल्याचे गोपनीय बातमीदारा मार्फत समजल्याने सदर ठिकाणी सापळा लावून संशयित इसमास गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेऊन त्याचे नाव पत्ता विचारले असता
त्याने त्याचे नाव रवींद्र गणपत राजगुरू वय ,५४ रा.अक्षय नगर,भोसरी, पिंपरी चिंचवड मूळ राहणार सावरगाव ता. जुन्नर जि. पुणे असे सांगितले. फिर्यादी ह्या वयस्कर असून घरी एकट्याच असल्याचे लक्षात आल्याने त्याने सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे.
त्याच्या ताब्यातून गुन्ह्यात चोरीस गेलेले मंगळसूत्र हस्तगत करण्यात आले आहे. सदर इसमाची वैद्यकीय तपासणी करून पुढील कार्यवाही कामी जुन्नर पोस्टे येथे जमा करण्यात आला असून पुढील तपास पोसई रघुनाथ शिंदे करत आहेत.
सदरची कार्यवाही पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे,पो.नि. प्रमोद क्षीरसागर,पो.नि. किरण अवचर,सपोनि. महादेव शेलार,सहा.फौज. दिपक साबळे
पो.हवा. राजू मोमीन,पो.हवा. संदीप वारे,पो.हवा. अक्षय नवले,पोशी. अभिमन्यू मोटे यांनी केली आहे.
