शेतात खुरपताना उष्माघाताने निमगावात महिलेचा मृत्यू?

1 min read

बेल्हे दि.२७:- निमगाव सावा (ता.जुन्नर) येथे शेतात काम करत असताना अचानक उष्माघाताचा त्रास झाल्याने रुपाली भाऊ गाडगे (वय ४१) या महिला शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मिळालेल्या माहितीनुसार, निमगाव सावा येथील माडीमळा/ गावमळा परिसरातील रहिवासी असलेल्या रुपाली गाडगे या सोमवार दि.२७ रोजी आपल्या शेतात खुरपणीचे काम करत होत्या. सकाळच्या सुमारास उन्हाची तीव्रता अधिक असताना त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. उष्माघाताचा तीव्र झटका बसल्याने त्या जागीच कोसळल्या असाव्यात. त्यांना प्राथमिक उपचारासाठी निमगाव सावा येथील एका खाजगी दवाखान्यात हलवण्यात आले. प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी नारायणगाव येथे नेताना त्यांची प्राणज्योत मावळली अशी माहिती सरपंच किशोर घोडे यांनी दिली.

एका कष्टकरी माऊलीचा अशा प्रकारे दुर्दैवी अंत झाल्याने गाडगे कुटुंबावर डोंगर कोसळला आहे. मृत रुपाली गाडगे यांच्या पश्चात पती, मुले आणि मोठा परिवार आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनाने आणि आरोग्य विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

वाढत्या तापमानामुळे विशेषतः शेतकरी आणि कष्टकऱ्यांनी दुपारी ११ ते ३ या वेळेत कष्टाची कामे टाळावीत. कामाच्या ठिकाणी सोबत पाणी, लिंबू सरबत किंवा ताक ठेवावे आणि डोक्याला रुमाल किंवा टोपीचा वापर करावा कडक उन्हाच्या वेळी शेतातकाम करणे, स्वयंपाक करणे टाळा.

स्वयंपाक करायची जागा हवेशीर करण्यासाठी दरवाजे आणि खिडक्या उघड्या ठेवा. दारु, चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड शीतपेये टाळा; कारण ते शरीराला हानी पोहचवू शकतात. अधिक प्रथिनेयुक्त अन्न टाळा आणि शिळे अन्न खाऊ नका.अशा सूचना देण्यात आल्या आहेत. याबाबत जुन्नरचे तहसीलदार बाळासाहेब शिरसाट यांना विचारणा केली असता ते म्हणाले की सदर महिला शेतामध्ये काम करत असताना चक्कर येऊन पडली. मृत्यू नेमका कशामुळे झाला हे शवविच्छेदनानंतर स्पष्ट होईल.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!