दिल्ली विमानतळावर स्वित्झर्लंडला जाणाऱ्या विमानाचा अपघात टळला; उड्डाणापुर्वी विमानाला लागली आग; २२८ प्रवाशी थोडक्यात बचावले

1 min read

नवीदिल्ली दि.२७:- दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर रविवारी पहाटे एक मोठा विमान अपघात थोडक्यात टळला. स्वित्झर्लंडमधील झुरिचला जाणाऱ्या ‘स्विस एअरलाईन्स’च्या विमानाच्या इंजिनला उड्डाणापूर्वी अचानक आग लागली. या विमानात २२८ प्रवासी आणि ४ लहान मुले प्रवासी म्हणून होती. या घटनेमुळे विमानतळावर प्रचंड खळबळ उडाली असून, सुदैवाने वैमानिकाच्या प्रसंगावधामुळे मोठा अनर्थ टळला आहे. मात्र, चार ते सहा प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे.स्विस एअरलाईन्सचे ‘एलएक्स १४७’ (एअरबस A330) हे विमान रात्री १:०८ च्या सुमारास धावपट्टीवर उड्डाणासाठी सज्ज होते. विमान वेगाने धावत असताना त्याच वेळी एका इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड होऊन अचानक आगीच्या ज्वाळा दिसू लागल्या. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून वैमानिकाने तत्काळ ‘टेकऑफ’ रोखले आणि इमर्जन्सी ब्रेक लावले. इंजिन निकामी झाल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.या घटनेनंतर, खबरदारीचा उपाय म्हणून रनवे 28 बंद करण्यात आला, ज्यामुळे विमानसेवा तात्पुरती विस्कळीत झाली.किंबहुना,विमानतळ कर्मचारी आणि बचाव पथकांच्या तत्परतेमुळे परिस्थिती लवकरच नियंत्रणात आणण्यात आली. विमानात 232 प्रवासी आणि 13 कर्मचारी होते. सर्व प्रवाशांना आपत्कालीन स्लाईडद्वारे सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. मात्र यावेळी प्रवाशांमध्ये काही प्रमाणात घबराट निर्माण झाली असली तरी, वेळीच कारवाई केल्यामुळे मोठे नुकसान टळले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, आपत्कालीन परिस्थितीत प्रवाशांना बाहेर काढताना चार जण किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सध्या सर्व प्रवासी सुरक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे. इंजिन निकामी होण्याचे आणि आग लागण्याचे कारण शोधण्यासाठी एअरलाइन आणि हवाई वाहतूक प्राधिकरणाने तपास सुरू केला आहे. प्राथमिकदृष्ट्या, हा एक तांत्रिक बिघाड असल्याचे मानले जात आहे, परंतु सविस्तर अहवाल मिळाल्यानंतरच हि परिस्थिती स्पष्ट होईल.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!