खामुंडीत गॅस टंचाईमुळे हॉटेल व्यवसायीकाची चुलीकडे धाव
1 min read
आळेफाटा दि.२७:- जुन्नर तालुक्यात गेल्या ८-१० दिवसांपासून जाणवणाऱ्या गॅस टंचाईचा फटका आता हॉटेल व्यवसायालाही बसला आहे. खामुंडी (ता. जुन्नर) गावातील ‘हॉटेल साई’चे मालक राहुल लोहकरे यांनी गॅस सिलिंडर मिळेनासा झाल्याने ग्राहकांची गैरसोय टाळण्या साठी थेट चुलीवर स्वयंपाक करण्यास सुरुवात केली आहे.
गॅस एजन्सीकडे व्यावसायिक सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाल्याने अनेक दिवसांपासून पुरवठा विस्कळीत आहे. ‘हॉटेल साई’चा गॅस संपल्यावर नवीन सिलिंडर मिळाला नाही. धंदा बंद ठेवण्याऐवजी लोहकरे यांनी हॉटेलच्या मागील बाजूस चूल पेटवली असून सध्या वडापाव, मिसळ, चहा,
भजी पासून जेवणाच्या ऑर्डरपर्यंत सर्व पदार्थ चुलीवर बनवले जात आहेत.लाकूड आणि गोवऱ्या वापरून पारंपरिक पद्धतीने स्वयंपाक सुरू आहे. राहुल लोहकरे बोलताना म्हणाले की “गॅस नाही म्हणून हॉटेल बंद ठेवायचं का? ग्राहक उपाशी जाऊ नये म्हणून चूल पेटवली.
चुलीवरच्या जेवणाला वेगळी चव येते, ती ग्राहकांनाही आवडतेय. मात्र धुराचा त्रास होतो आणि वेळही जास्त लागतो. लाकूडफाटा महाग झाल्याने खर्च वाढला आहे. गॅस पुरवठा लवकर सुरळीत व्हावा हीच अपेक्षा आहे.चुलीवर बनलेल्या पदार्थांना ‘स्मोकी फ्लेवर’ येत असल्याने अनेक ग्राहक खास चव घेण्यासाठी हॉटेलमध्ये येत आहेत.
जुनी पद्धत पुन्हा अनुभवायला मिळत असल्याची प्रतिक्रिया काही ग्राहकांनी दिली आहे.दरम्यान, जुन्नर तालुक्यात घरगुती आणि व्यावसायिक गॅसचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत असून नागरिक व व्यावसायिकांचे हाल होत आहेत. प्रशासनाने यात लक्ष घालून पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
