भोंदुगिरीचा प्रश्न ऐरणीवर….’बाळू मामाचा अवतार’ म्हणवणाऱ्या मनोहर भोसले याला अटक

1 min read

सोलापूर दि.२६:- राज्यात भोंदूबाबांच्या वाढत्या प्रकरणांदरम्यान आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. स्वतःला ‘बाळू मामाचा अवतार’ म्हणवणाऱ्या मनोहर मामा भोसले याला सोलापूर ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे.आर्थिक फसवणूक, अंधश्रद्धा पसरवणे आणि महिलांवरील अत्याचार यांसारख्या गंभीर आरोपांमुळे ही कारवाई करण्यात आली असून या प्रकरणाने पुन्हा एकदा समाजातील भोंदुगिरीचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे. मनोहर मामा भोसले याच्यावर यापूर्वीच अनेक गुन्हे दाखल आहेत. करमाळा आणि सोलापूर तालुका पोलीस ठाण्यांत महिलांवरील अत्याचाराचे प्रकरण नोंदवण्यात आले होते. याशिवाय बारामती आणि दौंड येथे आर्थिक फसवणूक आणि भोंदुगिरीचे गुन्हे दाखल आहेत. आता कुर्डूवाडी पोलीस ठाण्यातही नवीन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मनोहर भोसलेवर ‘कॅन्सरसारखे आजार बरे करतो’ असे खोटे दावे करून लोकांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. महिलांवरील अत्याचाराच्या प्रकरणात त्याला बार्शी सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. मात्र जामिनावर असतानाच त्याच्याविरोधात नव्याने गुन्हा दाखल झाल्याने पोलिसांनी त्याला पुन्हा ताब्यात घेतले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!