२३ गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश; ४६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त; तीन आरोपींना अटक

1 min read

पुणे दि.२६:- पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव तसेच इतर तालुक्यांमध्ये जबरी चोरी, चेन स्नॅचिंग आणि घरफोडीचे गुन्हे करणाऱ्या दोन सराईत टोळ्यांचा पर्दाफाश करण्यात पुणे ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. या कारवाईत पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून सुमारे ३२ तोळे सोन्याचे दागिने आणि इतर मुद्देमाल, असा एकूण ४६ लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांनी सराईत गुन्हेगारांवर लक्ष केंद्रित करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेने तपास करत असताना हर्षल दत्तात्रय तांदळे (वय २५) व महेश दत्तात्रय मंगळवेढेकर (वय २५, दोघे रा. मंचर) यांना पारगाव पोलीस स्टेशन हद्दीतून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून पारगाव, घोडेगाव, जुन्नर, नारायणगाव आणि आळेफाटा परिसरातील गुन्हे उघडकीस आले असून २९ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाआहे. दुसऱ्या एका कारवाईत पोलिसांनी पियुष बिरम नानावत (वय १९, रा. कामशेत, ता. मावळ) याला अटक केली. त्याने दोन विधीसंघर्षित बालकांच्या मदतीने केलेल्या गुन्ह्यांमधून १२ तोळे सोन्याचे दागिने आणि मोटारसायकल असा सुमारे १७ लाख रुपयांचा माल पोलिसांनी जप्त केला आहे. या दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये एकूण २३ गुन्हे उघडकीस आले असून, गुन्हेगारांकडून सोन्याचे दागिने, पल्सर मोटारसायकल आणि इतर वस्तू हस्तगत करण्यात आल्या आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!