जुन्नरचे नायब तहसीलदार यांचा अपघाती मृत्यू; अपघात की घातपात ?

1 min read

जुन्नर दि.२६:- जुन्नर- बनकरफाटा मार्गावरील गणपती फाट्याजवळ हायवा आणि कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात जुन्नरचे निवडणूक नायब तहसीलदार अनंता बनाजी गवारी (वय ५२) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. शनिवारी (दि.२५) दुपारी तीनच्या सुमारास पांगरी माथ्याजवळील वळणावर हा अपघात झाला. या घटनेत कारमधील महसूल विभागाचे अन्य दोन कर्मचारी जखमी झाले असून, महसूल वर्तुळात मोठी शोककळा पसरली आहे.मिळालेली माहिती अशी की, नायब तहसीलदार गवारी हे सहकारी अनंता विजय खार्तोडे (वय ४७) आणि तुषार कोरडे (वय ३५) यांच्यासह होंडा सिटी कारने ओतूरकडून जुन्नरकडे जात होते. यावेळी पांगरी माथ्याकडून बनकरफाट्याकडे जाणाऱ्या हायवा ट्रकने कारला जोराची धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की,कारचे तोंड विरुद्ध दिशेला फिरले. अपघातात गंभीर जखमी झालेल्या गवारी यांना उपचारासाठी ओतूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र पुढील उपचारासाठी पुण्याला नेत असताना त्यांचा मृत्यू झाला.अपघातात विजय खार्तोडे आणि तुषार कोरडे हे दोघे किरकोळ जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच ओतूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे, किशोर बर्डे, हवालदार गैंगजे आणि महिला हवालदार खोसे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात हलवून अपघातग्रस्त वाहने बाजूला केली आणि वाहतूक सुरळीत केली. कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत असून हायवा ने धडक दिल्याने हा अपघात की घात अशीही चर्चा होत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!