जिल्हा परिषद शाळांमध्ये मिळणार १० वी पर्यंतचे शिक्षण
1 min read
पुणे दि.२५:- ग्रामीण भागातील विशेषतः जिल्हा परिषद शाळेतील शिक्षण अधिक सक्षम, गुणवत्तापूर्ण आणि सर्वसमावेशक करण्याच्या दिशेने शासनाच्या आदेशानुसार पुणे जिल्हा परिषदेकडून पुणे जिल्हा परिषद शाळांचा दर्जा वाढ करण्यासाठीचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
यामध्ये तालुक्यांनी प्रस्तावित केल्यानुसार विद्यार्थ्यांची संख्या, स्थानिक गरज आणि पायाभूत सुविधा यांचा सखोल आढावा घेऊन आवश्यकतेनुसार हा विस्तार करण्यात आला आहे.निवडक जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना नैसर्गिक वाढीने इयत्ता ५ वी ते ८वी तसेच उच्च
प्राथमिक शाळांना इयत्ता ९ वी व १० वी चे वर्ग जोडण्यास मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मान्यतेने वर्ग सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना आपल्याच गावात असलेल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये टप्प्याटप्प्याने इयत्ता १ ली ते १२ वी पर्यंतचे मोफत गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देणे हा आहे.
सन २०२५ व २०२६ आजपर्यंत १९ शाळांना इयत्ता ५ वी चा वर्ग, पाच शाळांना इयत्ता ६ वी चा वर्ग, १२ शाळांना इयत्ता ८ वी चा वर्ग व ४ शाळांमध्ये इयत्ता ९ व १०वी चे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. या निर्णयाचे पालकांकडून मोठ्या प्रमाणात स्वागत होत आहे.
एकाच शाळेत इयत्ता १०/१२ वी पर्यंत शिक्षणाची सुविधा उपलब्ध झाल्यामुळे विद्यार्थ्यांचे विशेषतः मुलींचे शाळा सोडण्याचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे. भविष्यामध्ये जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या, स्थानिक गरज आणि पायाभूत सुविधा यांचे सर्वेक्षण करून, शाळांच्या आवश्यकतेनुसार ५ वी ते १० वी पर्यंतचे वर्ग सुरू
करण्यासाठीचे स्थानिक यंत्रणेद्वारे सर्वेक्षण करण्यात येत आहे.या उपक्रमाबाबत पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणाले, ग्रामीण पुण्यातील प्रत्येक विद्यार्थ्याला त्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने आपल्या गावाजवळच सातत्यपूर्ण आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, हा आमचा मुख्य उद्देश आहे.
जिल्हा परिषद शाळांमध्ये इयत्ता १० वीपर्यंतचे शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दिशेने हा महत्त्वपूर्ण निर्णय आहे. यामुळे शाळा सोडण्याचे प्रमाण कमी होईल आणि पालकांचा शासकीय शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ होईल.
