अहिल्यानगरमधील भोंदूबाबा गडगे प्रकरणात 200 हून अधिक व्हिडिओ, 90 हून अधिक औषधांचा साठा जप्त
1 min read
अहिल्यानगर दि.२५:-अहिल्यानगरमधील भोंदूबाबा राजेंद्र गडगे प्रकरणात 200 हून अधिक व्हिडिओ व 90 हून अधिक औषधांचा साठा जप्त करण्यात आला आहे. अहिल्यानगरच्या संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथील भोंदूबाबा राजेंद्र गडगे प्रकरणात पोलिसांनी मोठी कडक कारवाई केली आहे.
भोंदूबाबा राजेंद्र गडगे प्रकरणात पोलिसांनी 200 हून अधिक व्हिडिओ जप्त केले आहेत. हे सर्व व्हिडिओ आता फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवले जाणार आहेत. त्यातून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे. याशिवाय, भोंदूबाबा राजेंद्र गडगे यांच्या दत्तधाम आश्रमातून 90 हून अधिक संशयास्पद औषधांचा साठा जप्त करण्यात आला आहे.
त्या औषधांचे नमुनेही तपासासाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. संगमनेरचे अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, अहिल्यानगरमधील भोंदूबाबा राजेंद्र गडगे आणि त्याच्या कुटुंबीयांच्या नावावर अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर, अहिल्यानगर, नेवासा आणि राहाता परिसरात 13 बेकायदेशीर मालमत्ता असल्याचे तपासात उघड झाले आहे.
या भोंदूबाबा राजेंद्र गडगे यांच्या बेकायदेशीर मालमत्तांची माहिती मिळवण्यासाठी सब-रजिस्ट्रार कार्यालयाशी संपर्क साधण्यात आला आहे. तसेच, भोंदूबाबा राजेंद्र गडगे याची 10 वेगवेगळ्या बँकांमधील खात्याची व आर्थिक व्यवहारांची पडताळणी सुरू आहे. अहिल्यानगरमधील हा भोंदूबाबा राजेंद्र बापू गडगे हा कॅन्सरसारखे दुर्धर आजार मंत्रशक्तीने बरे करण्याचा दावा करत होता.
तसेच पुत्रप्राप्ती सारख्या अंधश्रद्धांना खतपाणी घालत होता. या भोंदूबाबा गडगेने अनेक महिलांची आणि कुटुंबांची फसवणूक केल्याचे आरोप करण्यात आले आहेत. या संदर्भात ग्रामीण रुग्णालयाकडून त्याला नोटीसही बजावण्यात आली आहे. या प्रकरणी भोंदूबाबा गडगेसह डॉ. मोहन पुरी, ज्ञानेश्वरी गडगे, सूरज शिंदे आणि मधुकर शिंदे या 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यापैकी भोंदूबाबा गडगे आणि मधुकर शिंदे सध्या पोलिस कोठडीत आहेत. बाकी 3 आरोपींचा शोध सुरू आहे.डॉ. मोहन पुरी हा संशयास्पद औषध पुरवठ्याचा प्रमुख सूत्रधार असल्याचा पोलिसांना संशय आहे, तर तो फरार आहे. अहिल्यानगर पोलिसांनी फसवणूक झालेल्या महिलांना व नागरिकांना पुढे येण्याचे आवाहन केले आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या उपचाराने बरे झाल्याच्या दाव्यांचीही अहिल्यानगरमधील पोलिसांकडून चौकशी केली जाणार आहे. संबंधित व्यक्ती खरेच रुग्ण होते का? किंवा त्यांचा भोंदूबाबा गडगेशी काही संबंध होता का? याचा तपास सुरू आहे.
या संपूर्ण प्रकरणामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. राज्यात अंधश्रद्धेच्या आडून चालणाऱ्या गैरप्रकारांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.याप्रकरणात अधिक तपास अहिल्यानगर पोलिस करत आहेत.
