गुणवत्ता संवर्धन अभियानात श्री बेल्हेश्वर विद्यामंदिर द्वितीय स्थानी

1 min read

बेल्हे दि.२५:- पुणे जिल्हा परिषद (माध्यमिक शिक्षण विभाग) व पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने शैक्षणिक वर्ष सन २०२५ २६ मध्ये घेण्यात आलेल्या गुणवत्ता संवर्धन अभियानात श्री बेल्हेश्वर विद्यामंदिर व कै.हरिभाऊशेठ गुंजाळ उच्च माध्यमिक विद्यालय, बेल्हे, जुन्नर (पुणे) या विद्यालयाचा तालुका स्तरावर इ. ५ ते १२ वी या गटात द्वितीय क्रमांक आला आहे, अशी माहिती विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र पडवळ यांनी दिली.रयत शिक्षण संस्थेचे श्री बेल्हेश्वर विद्यामंदिर हे उपक्रमशील विद्यालय असून गेली अनेक वर्ष विविध शासकीय स्पर्धा परीक्षांत विद्यालयाचे विद्यार्थी सातत्याने झळकत आहेत. कला, क्रीडा, विज्ञान, सांस्कृतिक अशा सर्वच उपक्रमांत तसेच पर्यावरण संवर्धनात विद्यालयाचा हिरीरीने सहभाग असतो. श्री बेल्हेश्वर विद्यामंदिर हे शाळा सिद्धी उपक्रमात अ श्रेणी प्राप्त विद्यालय असून यापूर्वीही विद्यालयास कर्मवीर पारितोषिक, हरित विद्यालय पुरस्कार असे विविध पुरस्कार प्राप्त झाले आहेत.सदर गुणवत्ता संवर्धन अभियानाचा पारितोषिक वितरण समारंभ गणेश कला क्रिडा रंगमंच,स्वारगेट,पुणे येथे नुकताच पार पडला. पुणे जिल्हा परिषद, पुणे चे माध्यमिक शिक्षणाधिकारी भाऊसाहेब कारेकर यांच्या हस्ते गौरवचिन्ह देऊन श्री बेल्हेश्वर विद्यालयास गौरविण्यात आले.विद्यालयाच्या या यशाबद्दल शाळा समिती शाळा व्यवस्थापन समिती, विद्यार्थी सुरक्षा व भौतिक विकसन समिती, महिला तक्रार निवारण समिती, सखी सावित्री समिती तसेच समस्त ग्रामस्थ यांनी आनंद व्यक्त केला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!