वरळीत महायुतीच्या ‘आक्रोश मोर्च्या’मुळे वाहतूक कोंडी; संतप्त महिलेचा आंदोलनकर्त्यांना आणि पोलिसांना जाब
1 min read
मुंबई दि.२२:- येथील वरळी भागात २१ एप्रिल रोजी महायुतीच्या महिला आघाडीने काढलेल्या ‘आक्रोश मोर्च्या’ मुळे प्रचंड वाहतूक कोंडी झाली. महिला आरक्षण विधेयक लोकसभेत संमत न झाल्याच्या निषेधार्थ काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांविरोधात हा मोर्चा आयोजित करण्यात आला होता.
मात्र, या मोर्च्यामुळे वरळी आणि परिसरातील रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दुपारी एक वाजता तर वाहतूक जवळपास एक तास पूर्णपणे ठप्प झाली होती. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.
याच वाहतूक कोंडीत एका चारचाकी वाहनातून प्रवास करणारी एक महिला जवळपास एक तास अडकून पडली होती. तासन् तास एकाच जागी अडकून पडल्यामुळे या महिलेचा संयम सुटला आणि संताप अनावर झाला. ती आपली कार रस्त्यातच सोडून थेट मोर्च्याच्या ठिकाणी पोहोचली.
तिथे पोहोचताच तिने आंदोलन करणाऱ्या महिलांना खडेबोल सुनावले. “मी एक तासापासून इथे अडकले आहे. तुम्हाला जर आंदोलन करायचेच असेल, तर बाजूच्या मैदानात जाऊन बसा! आमच्यासारख्या सर्वसामान्यांच्या रोजच्या आयुष्यात असा अडथळा का निर्माण करत आहात?” अशा शब्दांत तिने आपला रोष व्यक्त केला.
राग अनावर झाल्यामुळे या महिलेने काही आंदोलनकर्त्या महिलांना अपशब्दही वापरले. इतकेच नाही, तर तिथे उपस्थित असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनाही तिने चांगलेच धारेवर धरले. “तुम्ही येथे काय करत आहात? लोकांच्या रोजगाराला मुकावे लागत आहे, मुलांच्या शाळेला उशीर होत आहे,
तरीही तुम्ही हे आंदोलन चालू कसे ठेवताय? त्वरित रस्ता मोकळा करा!” असा जाब तिने पोलिसांना विचारला. या अनपेक्षित प्रकारामुळे आंदोलनस्थळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.या घटनेवरून हे स्पष्ट होते की, राजकीय आंदोलनांमुळे जेव्हा सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनात अडथळे निर्माण होतात,
तेव्हा त्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहिला जातो.लोकशाहीत आंदोलन करण्याचा हक्क सर्वांना आहे,परंतु त्यामुळे इतरांना वेठीस धरणे कितपत योग्य आहे,याचा विचार सर्वच राजकीय पक्षांनी आणि प्रशासनाने करायला हवा.
