एकाच प्लॅटफॉर्मवर दोन लोकल आल्याने स्टेशन मास्तर निलंबित
1 min read
मुंबई दि.२२:- सीएसएमटी -स्थानकाबाहेर मंगळवारी दुपारी सिग्नलमध्ये झालेल्या एका तांत्रिक बिघाडामुळे एक लोकल रेल्वे चुकीच्या मार्गावर वळवली गेली. यामुळे रेल्वे नियोजित प्लॅटफॉर्मऐवजी दुसऱ्याच प्लॅटफॉर्मच्या दिशेने गेली आणि दुसऱ्या एका रेल्वेपासून काही अंतरावर जाऊन थांबली.
या घटनेमुळे मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील सेवांवर परिणाम झाला.माहीतीनुसार, बदलापूरला जाणारी एक लोकल रेल्वे प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वर जाण्याऐवजी, चुकून प्लॅटफॉर्म क्रमांक ५ वर जाण्याचा सिग्नल मिळाल्यामुळे त्या दिशेने गेली. परिणामी, ही रेल्वे प्लॅटफॉर्मवर आधीच उभ्या असलेल्या
दुसऱ्या एका उपनगरीय लोकल रेल्वेपासून सुमारे २७० मीटर अंतरावर जाऊन थांबली. दुपारी ३:४० वाजता घडलेल्या या घटनेमुळे मुख्य मार्गावरील रेल्वे वाहतुकीवर काही काळापुरता परिणाम झाला. सदर लोकल रेल्वे पुन्हा मागे घेऊन योग्य मार्गावर आणल्यानंतर रेल्वे सेवा पूर्ववत सुरू झाल्या.
लोकल सेवा विस्कळीत होण्याची ही सलग तीसरी घटना आहे. एक दिवस आधीच, डोंबिवली स्थानकाजवळ कारशेडमधून बाहेर पडणाऱ्याएका लोकल रेल्वेचा रिकामा डबा रुळावरून घसरला होता. यामुळे सकाळी गर्दीच्या वेळी मुख्य मार्गावरील सेवांना १५ ते २० मिनिटांचा विलंब झाला होता.
या घटनेनंतर रेल्वे प्रशासनाने जबाबदारी निश्चित करत संबंधित स्टेशन मास्तरवर निलंबनाची कारवाई केली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने ही घटना अत्यंत गंभीर मानली जात आहे. या प्रकारामुळे सीएसएमटी स्थानकावरील ५ ते ८ क्रमांकाचे
प्लॅटफॉर्म काही काळ बंद ठेवण्यात आले.तज्ज्ञांच्या मते, अशा प्रकारची घटना सहसा घडत नाही. सिग्नल प्रणाली किंवा ट्रॅक कंट्रोल यंत्रणेत बिघाड झाल्यासच अशी परिस्थिती निर्माण होते.
