छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र वाचा: -डॉ आनंद कुलकर्णी
1 min read
निमगाव सावा दि.२१:- आपले भूमी ही छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी आहे.छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र आपण सर्वांनी वाचणे आवश्यक असून त्याचा अंगीकार केल्यास देशाचा सुजाण नागरिक घडेल. असे प्रतिपादन कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आनंद कुलकर्णी यांनी निमगाव सावा (ता.जुन्नर) येथे बोलताना केले.
श्री पांडुरंग ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित दिलीप वळसे पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील तृतीय वर्ष कला, वाणिज्य व विज्ञान वर्गाचा निरोप समारंभ कार्यक्रम प्रसंगी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष संदिपान पवार, संस्थेचे सचिव परेश घोडे, प्राचार्य प्रल्हाद शिंदे,
तंटामुक्ती अध्यक्ष परशुराम लगड इत्यादी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलनाने करण्यात आली. डॉ.कुलकर्णी पुढे म्हणाले की, आपल्या महाराष्ट्राला वैभवशाली संतांची परंपरा आहे.
त्यामध्ये माऊली ज्ञानेश्वर आणि तुकाराम महाराज यांचाही संदर्भ देत जे विज्ञानाने नंतर सिद्ध केले ते आधी ज्ञानेश्वरी मध्ये लिहिले गेले होते. ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेली ज्ञानेश्वरी, तुकाराम महाराजांची गाथा ही आज अवघ्या जगाला मार्गदर्शक ठरत आहे.
आपण सर्व विद्यार्थ्यांनी या सर्व गोष्टींचा विचार करून या थोर महात्म्यांचे संतांचे चरित्र वाचून अंगीकारले पाहिजे असे सांगितले.याप्रसंगी संस्थेचे सचिव परेश घोडे यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेच्या शुभेच्छा दिल्या.सिद्धांत शेळके, कल्याणी पानमंद,साईनाथ कोयमहाले सानिका हिंगे,
निशा साळवे या विद्यार्थ्यांनी आणि अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा.अनिल पडवळ व प्राचार्य प्रल्हाद शिंदे यांनी मनोगतात विद्यार्थ्यां प्रति कृतज्ञता व्यक्त करत सर्वांना परीक्षेच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी तृतीय वर्ष कला वाणिज्य विज्ञान शाखेतील विद्यार्थी प्रथम व द्वितीय वर्षाचे विद्यार्थी,
सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.ज्योती गायकवाड, प्रास्ताविक, प्रा.नीलम गायकवाड आणि सुभाष घोडे यांनी आभार मानले.
