जीवघेणं ऊन; राज्यात उष्माघातामुळे दोन जणांचा मृत्यू
1 min read
मुंबई दि.१६:-:राज्यात सुर्याने रौद्ररूप धारण केले असून पारा प्रचंड वाढल्याचे दिसत आहे. वाढत्या उष्णतेमुळे राज्यातील दोघांचा उष्माघाताने बळी गेला आहे. राज्य सरकारनेही उष्माघाताने दोन बळी गेल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
खबरदारी म्हणून राज्यातील सरकारी रूग्णालयांमध्ये उष्माघाताच्या रूग्णावर त्वरीत उपचार होण्यासाठी विशेष सोय करण्यात आली आहे. अक्कलकोट (जि. सोलापूर) तालुक्यातील एका व्यक्तीचा तर धुळयातील माजी सरपंच महिलेचा उष्माघातामुळे बळी गेला आहे. उष्णतेची ही लाट आणखी काही दिवस राहील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
बहुतांशवेळा एप्रिल-मे महिन्यात उन्हाचा तडाखा वाढतो.पण यंदा मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच पाऱ्याने विक्रमी उंची गाठली आहे.या उन्हाचा तडाखा बसून अक्कलकोट तालुक्यातील प्रसन्न बिराजदार या व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला होता.
तर धुळ्यातील शिरपूर तालुक्यातील बाभुळदे येथील माजी सरपंच मालतीबाई शेनपडू निकुंभे (वय ४९) यांचा बुधवारी उष्माघाताने मृत्यू झाला होता. धुळे शहरात गेल्या वर्षांच्या तुलनेत यंदा उन्हाची तीव्रता अधिक जाणवत आहे. मार्च महिन्यातच तापमानाचा पारा ४३ अंशांवर गेल्यामुळे
नागरिकांना दुपारच्यावेळी घराबाहेर पडणे देखील कठीण होत आहे. परिणामी जिल्ह्यातील रस्त्यांवर दुपार दरम्यान शुकशुकाट दिसून येतो. गेल्या वर्षी २८ मार्चला ४१.० इतके कमाल तापमान नोंदवण्यात आले. यंदा मात्र २८ मार्चला ४३.४ अंश सेल्सियस एवढे तापमान नोंदवले गेले. ४४ अंशापर्यंत तापमान वाढल्यानंतर
याचे तीव्र परिणाम येथील जनजीवनावर होतांना दिसून येत आहे. दोनच दिवसांपूर्वी रायगड जिल्ह्यातील भिरा गावात जगातील सर्वाधिक तापमानाची (४६.५) नोंद झाली होती. त्यामुळे राज्य सरकारच्या वतीनेही नागरिकांना उन्हाच्या वेळी बाहेर न पडण्याचा सल्ला देण्यात आला असून योग्य ती खबरदारी पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
राज्यातील दोन नागरिकांचा उष्माघातामुळे मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य मंत्री दिपक सावंत यांनी दिली. सर्व सरकारी रूग्णालयांना उष्माघाताच्या रूग्णांची योग्य ती काळजी घेण्याच्या सूचना दिल्याचेही त्यांनी सांगितले. देशातील इतर भागातही उष्णतेने नागरिक हैराण झाले आहेत.
लहान मुले व आबालवृद्धांना दाहकतेचा प्रकर्षणाने त्रास होत असून यापासून बचाव व्हावा, उष्माघाताने कोणतीही जीवित हानी होऊ नये यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात आहे. जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्ष, महापालिका नियंत्रण कक्ष, विभागीय स्तरावरील कक्ष,
आरोग्य विभाग यांनी एकत्रितपणे उष्माघातापासून बचाव व्हावा यासाठी पत्रके, फलक यांच्या माध्यमातून जनजागृती सुरू केली आहे. कामाशिवाय दुपारी १२ ते सायंकाळी चार या कालावधीत कोणी उन्हात बाहेर पडू नये असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
आरोग्य विभाग सतर्क असून उष्माघाताची लक्षणे जाणवत असल्यास आपत्कालीन आरोग्य सेवा अर्थात १०८ रुग्णवाहिकेचा आधार घ्यावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
