बनावट सोन्याची बिस्किटे सांगून फसवणूक करणारी टोळी जेरबंद;३ लाख ९३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
1 min read
मंचर दि.१५:- मंचर पोलीस स्टेशन हद्दीत गेल्या काही दिवसांपासून वृद्ध महिला व पुरुषांना बनावट सोन्याच्या बिस्किटांचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या सराईत टोळीचा मंचर पोलिसांनी पर्दाफाश केला असून.
सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत सुमारे ३ लाख ९३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
संबंधित आरोपी हे वयोवृद्ध नागरिकांना लक्ष्य करत होते. बनावट पिवळ्या धातूची बिस्किटे सोन्याची असल्याचे भासवून ती स्वस्तात देण्याचे आमिष दाखवले जात होते. या प्रकरणी मंचर पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल झाले होते.पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांच्या मार्गदर्शना खाली तपास सुरू असताना
दि. ९ एप्रिल २०२६ रोजी कळंब (ता. आंबेगाव) परिसरात पुणे-नाशिक महामार्गालगत एका हॉटेलजवळ संशयास्पद पद्धतीने उभी असलेली पांढऱ्या रंगाची टोयोटा कंपनीची कार पोलिसांच्या निदर्शनास आली. पोलिसांनी तत्काळ कारची झडती घेतली असता त्यामध्ये सहा संशयित आढळून आले.
सुरुवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली; मात्र कसून चौकशीअंती त्यांनी गुन्ह्यांची कबुली दिली.अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये गणेश विनायक गायकवाड (वय ३७, रा. भालगाव, ता. पाथर्डी, जि. अहिल्यानगर), बंडू लक्ष्मण जाधव (वय ४८, रा. गांधीनगर, बीड), मनोहर भाऊसाहेब जाधव (वय ३५, रा. एकनाथवाडी, ता. पाथर्डी),
खंडू बंडू जाधव (वय २०), सतिश रस्तूम पवार (वय ३३) व सोमनाथ निवृत्ती फुंदे (वय ४५) यांचा समावेश आहे.सदर प्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम ३१८ (४), ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक करून पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
तपासादरम्यान आरोपींकडून फसवणुकीत वापरलेले सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.तसेच पुढील चौकशीत आरोपींनी यापूर्वीही मंचर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या २०२४ व २०२५ मधील दोन फसवणूक गुन्ह्यांची कबुली दिली आहे. त्या गुन्ह्यांतील मुद्देमालही पोलिसांनी हस्तगत केला आहे.
