बेल्ह्यात देवीच्या पाया पडून चोरट्याची मंदिरात चोरी

1 min read

बेल्हे दि.१४:- बेल्हे गावच श्रद्धास्थान असलेल्या श्री मुक्ताई देवीच्या मंदिरात मंगळवार दि.१४ पहाटे तीनच्या सुमारास दोन चोरट्यांनी चोरी केल्याची घटना घडली असून, दोन्ही चोरटे सीसीटीव्ही मध्ये स्पष्ट दिसत असल्याचे दिसून येत आहे.याबाबतची माहिती अशी की, नेहमीप्रमाणे मंगळवार सकाळी देवीच्या मंदिरात साफसफाई व नित्य पूजेसाठी संतोष क्षीरसागर हे देवीचे पुजारी गेले असता, त्यांना देवीचा गाभारा उघडा दिसला व काहीतरी अनुचित प्रकार घडल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्याचवेळी त्यांनी ही घटना श्री मुक्ताई मंदिर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष जानकू डावखर यांना तत्काळ कळवली. त्यांनीही तातडीने आळेफाटा पोलीस ठाण्याची संपर्क साधून त्यांना सदर घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तत्काळ सदर घटनेची पाहणी करून तपास सुरू केला. CCTV कॅमेरे तपासणी केली. देवीचे मौल्यवान दागिने बँकेच्या लॉकर मध्ये सेफ असल्याने चोरीचा अनर्थ टाळला.त्यामुळे कोणताही मौल्यवान ऐवज सुदैवाने चोरीला गेला नाही. मात्र बेन्टेक्स चे दागिने चोरट्याने पळवले. अशी माहिती अध्यक्ष जानकु डावखर यांनी दिली. विशेष म्हणजे देवीच्या मंदिरात चोरी करणारा चोर भाविक भक्त निघाल्याची घटना घडली आहे. चोराने देवीच्या अंगावरील दागिन्यांची चोरी करण्या अगोदर अगदी मनोभावे देवीचे चरण स्पर्श करून दर्शन घेतले व देवीच्या मूर्तीसमोर हात जोडून प्रार्थना केली.चोराचा हा भक्तीभावाचा अवतार मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असुन, देवीचे दर्शन घेतल्यावर त्याने देवीचे दागिने काढून घेतल्याचे दिसून येत आहे. दरम्यान या सर्व प्रसंगाचे चित्रण पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतल्याचे समजते. मंगळवार दि. १४ सायंकाळ पर्यंत सदर चोरीच्या गुन्ह्याची नोंद आळेफाटा पोलीस ठाण्यात झाली नव्हती.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!