जय मल्हार कृषी पर्यटन केंद्राचा निष्काळजीपणा; स्लाईडवरून पडून ३७ वर्षीय महिलेचे अर्धे शरीर निकामी; पार्कचे मालक आणि व्यवस्थापक गुन्हा दाखल

1 min read

शिरूर दि.९:- पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील मोराची चिंचोली येथील एका कृषी पर्यटन केंद्रात अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पर्यटनाचा निखळ आनंद लुटण्यासाठी वॉटर पार्कमध्ये गेलेल्या एका कुटुंबावर प्रशासनाच्या एका गंभीर चुकीमुळे अचानक दुःखाचा डोंगर कोसळला. वॉटर स्लाईडच्या ठिकाणी असलेल्या पाण्याच्या अपुऱ्या पातळीकडे दुर्लक्ष केल्यामुळे एका महिलेला कायमस्वरूपी अपंगत्व आले असून, या ताज्या प्रकरणाने पर्यटन केंद्रांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे. मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, शिरूर तालुक्यातील करंदी गावात वास्तव्यास असलेल्या अश्विनी संदीप नप्ते (वय ३७ वर्षे) या आपल्या कुटुंबासह मोराची चिंचोली येथील जय मल्हार कृषी पर्यटन केंद्रात सहलीसाठी गेल्या होत्या. कुटुंबासोबत हसत-खेळत वेळ घालवत असताना त्या तेथील वॉटर स्लाईडचा अनुभव घेत होत्या. उंचावरून स्लाईडच्या माध्यमातून अतिशय वेगात खाली येत असताना, स्लाईडच्या शेवटच्या टप्प्यात पाण्याचा साठा अत्यंत कमी असल्याचे कोणाच्याही लक्षात आले नाही. पुरेशा पाण्याचा अभाव असल्याने अश्विनी थेट खाली जमिनीवर अतिशय जोरात आपटल्या. हा आघात इतका भीषण होता की त्या जागीच बेशुद्ध पडून कोसळल्या.या धक्कादायक प्रकारामुळे तेथे उपस्थित नागरिकांमध्ये आणि नातेवाईकांमध्ये एकच खळबळ उडाली. कुटुंबीयांनी त्वरित मदतीसाठी मोठी धावपळ सुरू केली. मात्र, अत्यंत संतापजनक बाब म्हणजे या वॉटर पार्कमध्ये अशा आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी कोणतीही तातडीची प्राथमिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध नव्हती. रुग्णाला रुग्णालयात नेण्यासाठी साधी रुग्णवाहिका देखील या पर्यटन केंद्राकडे उपलब्ध नसल्याचा गंभीर आरोप नातेवाईकांनी केला आहे. अखेर नातेवाईकांनी स्वतःच्या प्रयत्नांनी एका खाजगी रुग्णवाहिकेची तातडीने व्यवस्था करून अश्विनी यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले.रुग्णालयात डॉक्टरांनी केलेल्या वैद्यकीय तपासणीत एक अत्यंत वेदनादायी सत्य समोर आले. उंचावरून वेगाने आपटल्यामुळे अश्विनी यांच्या पाठीच्या मणक्याला गंभीर दुखापत झाली असून,मणक्याचे तब्बल चार तुकडे झाल्याचे तपासणीत निष्पन्न झाले. या भयंकर दुखापतीमुळे त्यांच्या शरीराचा अर्धा भाग कायमस्वरूपी निकामी झाला आहे.या दुर्दैवी घटनेनंतर कुटुंबाला मोठा मानसिक धक्का बसला असून व्यवस्थापनावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या संपूर्ण संदर्भात किरण नप्ते यांनी दिलेल्या अधिकृत तक्रारीवरून शिरूर पोलीस ठाण्यात वॉटर पार्कचे मालक आणि व्यवस्थापक यांच्या विरोधात रीतसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील सविस्तर तपास पोलीस उपनिरीक्षक गोविंद खटिंग करत आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!