भोंदू अशोक खरात प्रकरणातील सर्व व्यवहारांची ईडी चौकशी होणार:- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

1 min read

नाशिक दि.६:- नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण राज्यभर गाजलं आहे. या भोंदूबाबा अशोक खरातला बलात्काराच्या आरोपाखाली पोलिसांनी अटक केली आहे. सध्या खरात कोठडीत असून त्याची एसआयटीद्वारे चौकशी करण्यात येत आहे. या प्रकरणात दररोज अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. याच अशोक खरात प्रकरणाबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली असून अशोक खरात प्रकरणातील सर्व व्यवहारांची ईडी चौकशी होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.अशोक खरात प्रकरणात आतापर्यंत १२ गुन्हे दाखल झाले आहेत आणि दररोज नवीन माहिती समोर येत आहे. या प्रकरणात एसआयटी रोज काय तपास करते हे रोजच सांगता येणार नाही. पण एसआयटी योग्य वेळी या प्रकरणाबाबत सविस्तर माहिती देईल. त्यामुळे मला वाटतं की सर्वांनी एसआयटीवर विश्वास ठेवावा. एसआयटी उत्तम काम करत आहे”, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. अशोक खरात प्रकरणातील सर्व व्यवहारांची ईडी चौकशी होणार का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, “खरात प्रकरणातील व्यवहारांबाबत नक्कीच ईडी चौकशी होणार आहे. त्याबाबत ईडीने या गोष्टीची माहिती घेतली आहे. ईडीनेही त्यांची कारवाई सुरू केलेली आहे. एकदा खरातच्या जमिनी कुठे-कुठे आहेत, याची माहिती समजली की नियमानुसार जे-जे करावं लागेल ते आम्ही करणार आहोत”, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे.अशोक खरात प्रकरणातील सीडीआर कोणालाही प्राप्त करून घेण्याचा अधिकार नाही. तो अधिकार फक्त ज्या तपास यंत्रणा आहेत त्यांनाच तो अधिकार आहे. मात्र, या प्रकरणातील सीडीआर कसा लीक झाला? तो सीडीआर कोणी लीक केला? या संदर्भातील चौकशी राज्य सरकार करणार आहे. मला असं वाटतं की अशा प्रकारच्या प्रकरणात फक्त आरोप-प्रत्यारोप करून चालत नाही. ज्यांच्या विरोधात सबळ पुरावा असेल त्यांच्यावर कारवाई होईलच. मात्र, कोण-कोणाशी बोललं या आधारावर आपली क्रिमिनल जस्टिस सिस्टम चालत नाही”, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. सीएम फडणवीस यांनी केलेल्या ईडी चौकशीच्या घोषणेने भोंदूबाबा अशोक खरातचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे. अनेकांना घाम फोडणाऱ्या आणि त्रस्त करणाऱ्या ईडीचा ससेमिरा आता खरातच्या मागे लागण्याची शक्यता आहे. तर त्याचवेळी अनेक संशयास्पद कोट्यवधीचे व्यवहार रडारवर आले आहेत. हे व्यवहार नेमके कुणाचे आहेत? या व्यवहारात कोण कोण आहेत? याची इत्यंभूत माहिती समोर येणार आहे. त्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!