मोबाईलच्या आहारी बालपण; पारंपारिक खेळ नामशेष होण्याच्या उंबरठ्यावर
1 min read
पुणे दि.४:- आजच्या बदलत्या काळात “आम्ही पोरं, चोरतो बोरं…” म्हणत गल्लोगल्ली रंगणारे बालपण आता विरळ होत चालले आहे. विटीदांडू, पळापळी, मामाचं पत्र हरवलं, डोंगराला आग लागली अशा पारंपारिक खेळांची जागा आता टेक्नोसॅव्ही आणि चायनामेड खेळण्यांनी घेतली आहे.
मोबाईल व संगणक गेम्सच्या वाढत्या प्रभावामुळे मैदानी खेळ हळूहळू इतिहासजमा होण्याच्या मार्गावर आहेत.पूर्वी सुट्टीचा दिवस म्हणजे प्रत्येक गल्लीत मुलांचा गोंगाट हमखास ऐकू यायचा. पोरांचा खेळ, मोठ्यांची हाक आणि त्यातलं बालपण… हे चित्र ग्रामीण भागासह शहरांमध्येही सर्वत्र दिसायचे.
मात्र आता मोबाईल आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या आहारी गेलेल्या मुलांमुळे गल्ल्या ओस पडत आहेत. अँग्री बर्ड, मारीओसारख्या डिजिटल गेम्सनी विटीदांडूसारख्या खेळांना मागे टाकले आहे. शहरीच नव्हे तर ग्रामीण भागातील मुलंदेखील मोबाईल गेम्समध्ये गुंतलेली दिसतात.
या डिजिटल गेम्समुळे मुलांच्या बुद्धीला चालना मिळत असली तरी त्यांचे सामाजिक आणि शारीरिक जीवन मर्यादित होत चालले आहे. मित्रांसोबत खेळण्याचा आनंद, संवाद कौशल्य आणि समूहभावना कमी होत आहे. परिणामी, गल्लोगल्ली ऐकू येणारा किलबिलाट आता हळूहळू नाहीसा होत आहे.
यामध्ये पालकांचाही मोठा वाटा असल्याचे दिसून येते. मुलांना बाहेर खेळण्यासाठी पाठवण्याऐवजी घरातच मोबाईल किंवा संगणकावर खेळण्याची सवय लावली जात आहे. शाळांमध्येही मधल्या सुट्टीत मैदानी खेळांचे प्रमाण घटले आहे.बालरोग तज्ज्ञांच्या मते, मुलांमध्ये आढळणाऱ्या
अनेक आजारांचे एक प्रमुख कारण म्हणजे मोबाईल व संगणक गेम्सचा अतिरेकी वापर. घरात बसून खेळण्यामुळे शारीरिक हालचाली कमी होतात आणि त्यामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. म्हणूनच, पालकांनी सजग होऊन मुलांना मैदानी खेळांकडे वळवणे गरजेचे आहे.
पारंपारिक खेळ केवळ मनोरंजन नाहीत, तर ते मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. बालपण पुन्हा गल्लीत यावे, यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेणे ही काळाची गरज आहे.
