पिंपळवंडीत मनोरुग्ण व्यक्तीचे रेस्क्यू

1 min read

पिंपळवंडी दि.२:- खूप दिवसांपासून पिंपळवंडी परिसरात परमवीर उर्फ बाळू कोंडीभाऊ वाघ, वाघपट्टा या भागात एक मनोरुग्ण व्यक्ती राहत असून, गेल्या काही दिवसांपासून तो नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास देत होता. विशेषतः पुणे-नाशिक हायवेवर गाड्या अडवून थांबवणे, वाहनचालकांना घाबरवणे अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत होत्या. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. वन्यजीव निसर्ग संवर्धन रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी तात्काळ धाव घेत अत्यंत दक्षतेने आणि संयमाने त्या मनोरुग्ण व्यक्तीचे रेस्क्यू केले. कोणालाही इजा होऊ न देता ही कारवाई यशस्वीपणे पार पाडण्यात आली.या रेस्क्यू मोहिमेत टीमचे सदस्य आकाश माळी, दीपक माळी, निकास माळी, हेमंत घाडगे , कमलेश गोसावी, रोहन जाधव आणि रवी माळी यांनी महत्त्वाची भूमिका बजावत त्या व्यक्तीला सुरक्षितरित्या ताब्यात घेतले. तसेच, पिंपळवंडी येथील पोलीस पाटील इरफान तांबोळी व पिंपळवंडीचे सरपंच मेघाताई राजेश काकडे यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य या संपूर्ण कारवाईत लाभले.यानंतर त्या व्यक्तीला आळेफाटा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांच्या सहकार्याने पुढील वैद्यकीय उपचारासाठी त्याला पुणे येथील येरवडा मनोरुग्ण रुग्णालयात पाठवण्यात आले. या संपूर्ण कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी मोठा दिलासा व्यक्त केला असून, वन्यजीव निसर्ग संवर्धन रेस्क्यू टीम व पोलिस प्रशासनाचे आभार मानले जात आहेत. समाजाच्या सुरक्षिततेसाठी व अशा गरजू व्यक्तींना योग्य उपचार मिळावेत यासाठी अशा प्रकारच्या तत्पर कार्याची गरज असल्याचे यावेळी अधोरेखित झाले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!