पारगाव तर्फे आळे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी कैलास डुकरे यांची निवड
1 min read
पारगाव तर्फे आळे दि.२८:- (शब्दांकन:- विकास चव्हाण) कैलास डुकरे यांची जडणघडण ही केवळ एका कुटुंबात नाही, तर एका समृद्ध सामाजिक परंपरेत झाली आहे.
त्यांची पणजी कैलासवासी भागुबाई विठोबा डुकरे या कडक शिस्त, कणखर स्वभाव, धाडसी वृत्ती आणि वागण्या-बोलण्यातला दबदबा या ठळक वैशिष्ट्यांसाठी ओळखल्या जात.
त्यांचे माहेर मंगरूळ येथील लामखडे परिवारातले होते. त्यांनी सुरू केलेले ‘भैरवनाथ हॉटेल’ हे ‘भागाबाईचं हॉटेल’ या नावाने पंचक्रोशीत ओळखले जायचे— जिथे चहा, भेळ आणि लाडू यासाठी लोकांची कायम गर्दी असायची. ते ठिकाण केवळ हॉटेल नव्हतं, तर माणुसकी,आपुलकी आणि स्नेह यांचा दरवळ कायम ठेवणारं ठिकाण झालं होतं.
पुढे कैलासराव यांची आजी वै. इंदुबाई शिवराम डुकरे आणि आजोबा वैकुंठवासी शिवराम विठोबा डुकरे यांच्या काळात कष्ट,प्रामाणिकपणा आणि समाजाशी घट्ट नाळ जोडण्याची परंपरा अधिक बळकट झाली.त्या काळातील शिक्षणाच्या मर्यादित सोयी लक्षात घेऊन, आजी इंदुबाई यांनी आपल्या माहेरच्या नात्याला जपत मच्छिंद्र बाबुराव म्हस्के
आणि लक्ष्मण बाबुराव म्हस्के या भावंडांना आपल्याकडे पारगाव येथे ठेवत त्यांचे शिक्षण पूर्ण करून घेतली.ही त्यांच्या मायेची, कर्तव्यभावनेची आणि नात्यांप्रती असलेल्या जिव्हाळ्याची जिवंत साक्ष आहे. आज चोबुत गावामध्ये उभा असलेला गौरवशाली म्हस्के परिवार हा त्यांच्या त्याग आणि संस्कारांचा परिणाम आहे.
चोबुत गावाच्या जडणघडणीमध्ये म्हस्के परिवाराचा तीन पिढ्यांचा मोठा वारसा आहे. हीच परंपरा कैलासराव यांचे वडील स्व. सुभाष शिवराम डुकरे यांनी समर्थपणे पुढे नेली. स्व. सुभाष आण्णा हे हाडाचे शेतकरी, प्रामाणिक सामाजिक कार्यकर्ते आणि माणुसकी जपणारे व्यक्तिमत्त्व होते.
ते आमदार वल्लभ बेनके यांचे खंदे समर्थक होते आणि त्यांच्या माध्यमातून अनेक विकासकामांना चालना मिळाली. त्यांचा मोठा जनसंपर्क होता. त्यांनी गावातील विविध क्षेत्रातील मान्यवरांशी जिव्हाळ्याचे संबंध प्रस्थापित केले होते. गंगाराम रामा डुकरे (तात्या), काशिनाथ श्रीपत डुकरे,(बाळू सर)
कै. डॉ. के. एस. खराडे, बबन चव्हाण सर, संभाजी शेठ चव्हाण, कै. कृष्णा सखाराम डुकरे (मा. सरपंच), बुढनभाई मोमीन, रावसाहेब बोऱ्हाडे (मा. पोलिस पाटील),आवडाजी नारायण डुकरे, स्व. ज्ञानदेव भाऊ डुकरे, बारकु विश्वे
यांसारख्या मान्यवरांशी त्यांचे घट्ट मैत्रीचे ऋणानुबंध होते.
“मरावे परी कीर्ती रूपी उरावे” या संत वचनाचा प्रत्यय त्यांच्या कार्यातून येतो.
कैलासराव यांचे पितृछत्र लहान वयात हरपल्यामुळे कुटुंबाची जबाबदारी त्यांच्या मातोश्री गंगुबाई यांच्यासोबत त्यांच्या खांद्यावर आली. बंधू कुंडलिक यांच्या खंबीर साथीत त्यांनी या जबाबदाऱ्या जिद्द, कष्ट आणि चिकाटीच्या बळावर यशस्वीरित्या पार पाडत आज एक सक्षम आणि विश्वासार्ह व्यक्तिमत्त्व म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
अनेक अडचणींना सामोरे जात, मातोश्री गंगुबाई यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच बंधू कुंडलिक यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी कष्ट, प्रामाणिकपणा आणि परंपरेचा वारसा जपला.आजही या प्रदीर्घ परंपरेची धुरा बंधू कुंडलिक समर्थपणे पुढे चालवत आहेत.
त्या हॉटेलमधील चहा आजही तितकाच प्रसिद्ध असून, ग्राहकांची सततची रेलचेल ही त्या परंपरेच्या जिवंतपणाची साक्ष देत उभी आहे. संस्कारांची शिदोरी घेऊन कैलासराव आज समाजात कार्यरत आहेत. आजोबा आणि वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांनी समाजाशी असलेलं नातं अधिक दृढ केलं आहे.
गरजूंना मदतीचा हात देणं, सर्वांना सोबत घेऊन चालणं. आणि नात्यांना जपणं हीच त्यांची खरी ओळख आहे. ही निवड केवळ एका व्यक्तीची नाही, तर एका विचाराची, संस्कारांची आणि समाजाशी असलेल्या नात्याची निवड आहे.
कैलासराव सुभाष डुकरे यांना पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा! आपल्या नेतृत्वाखाली सोसायटी अधिक सक्षम, पारदर्शक आणि लोकाभिमुख होवो, हीच सदिच्छा..!
शब्दांकन : विकास हरिभाऊ चव्हाण, तज्ञ संचालक श्री विघ्नहर सहकारी साखर कारखाना लिमिटेड जुन्नर आंबेगाव.
