पंतप्रधान नरेंद्र मोदी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत? सर्व मुख्यमंत्र्यांना निरोप धाडला; आज उच्चस्तरीय बैठक घेणार
1 min read
नवीदिल्ली दि.२७:- मध्य-पूर्वेतील वाढत्या युद्धजन्य तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची उद्या शुक्रवारी उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. या संकटाला कोरोना महामारीइतके गंभीर मानले जात असून, बैठकीत इंधन, अर्थव्यवस्था,नागरिकांची सुरक्षा आणि आपत्कालीन सज्जता यावर चर्चा होणार आहे.
संध्याकाळी ६.३० च्या सुमारास व्हिडिओ कॉन्फ्रन्सिंगच्या माध्यमातून होणाऱ्या या बैठकीमध्ये पंतप्रधान मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणात आहेत.केंद्र सरकारकडून देशात एलपीजी व इंधनाचा तुटवडा नसल्याचे वारंवार सांगितले जात आहे. मात्र, दुसरीकडे युध्दपातळीवर विविध उपाययोजना केल्या जात असल्याने
पुढील काळात ऊर्जा संकट उभे ठाकणार का, याबाबत चर्चांना उधाण आले आहे. संसदेत बोलताना पंतप्रधान मोदींनी कोरोना काळातील एकजुटी आठवण करून देत सध्याच्या स्थितीत यापुढेही टीम इंडिया म्हणून काम करण्याचे आवाहन सर्व राज्यांना केले होते.
त्यानंतर आज त्यांच्याकडून देशातील सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशातील मुख्यमंत्र्यांना निरोप धाडण्यात आला आहे. शुक्रवारी सर्वांची बैठक बोलाविण्यात आली आहे. अमेरिका-इस्त्रायलकडून इराणवर हल्ला सुरू केल्यानंतर पहिल्यांदाच सरकारने मुख्यमंत्र्यांची बैठक आयोजित केली आहे.
त्यामुळे या बैठकीला महत्व प्राप्त झाले आहे. पंतप्रधान नेमके कोणते मुद्दे मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार, आगामी काळात कोणते महत्वाचे निर्णय घेतले जाणार का याबाबत उत्सुकता वाढली आहे. या बैठकीला सध्या विधानसभा निवडणूक असलेल्या राज्यांतील मुख्यमंत्री उपस्थित राहणार नाहीत.
मागील काही दिवसांपासून इराण युध्दाच्या पार्श्वभूमीवर देशात वेगवान घडामोडी घडत आहेत. एलपीजीचा तुटवडा निर्माण होऊ नये, यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. पीएनजीचा वापर वाढविण्यासाठी आवाहन केले जात आहे. रॉकेलची उपलब्धता वाढविण्यात आली आहे.
पंतप्रधान मोदींनी एकजुट राहण्याचे आवाहन संसदेत केले आहे. केंद्र सरकारने बुधवारीच विरोधी पक्षाच्या नेत्यांची बैठक घेत त्यांना युध्दाच्या स्थितीची माहिती दिली होती. आता शुक्रवारी मुख्यमंत्र्यांची बैठक घेतली जाणार आहे.केंद्र सरकारच्या पातळीवर सुरू असलेल्या या घडामोडी देशापुढील आव्हानांचे संकेत देत आहेत.
पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणामुळे युध्द असेच सुरू राहिले तर भारतासह संपूर्ण देशासमोर मोठे आव्हान उभे राहण्याची भीती व्यक्त केली होती. देशात सध्या भरपूर इंधन साठा असल्याचे सांगत त्यांनी देशवासियांना दिलासाही दिला. इंधन, गॅस मिळविण्यासाठी उपलब्ध सर्व स्त्रोतांचा उपयोग केला जात असल्याचेही त्यांनी म्हटले होते.
