वळसे पाटील महाविद्यालयात महिला सक्षमीकरण; राष्ट्रीय चर्चासत्र व कर्तृत्ववान महिलांचा सन्मान

1 min read

निमगाव सावा दि.२५:- ‘वैचारिक प्रदुषण थोपविणे आवश्यक असून, महिलांचा आत्मविश्वास टिकणे ही काळाची गरज आहे. पारंपरिक तसेच सीमित अशा जखडलेल्या गुलामी मानसिकतेतून स्त्रियांची मुक्तता मोलाची ठरेल. स्त्रियांचे जग अर्थात् अधिकार विश्व हे एकसंघ असावे ‘ असे प्रतिपादन विख्यात लेखिका आणि ज्येष्ठ सर्वोदयी कार्यकर्त्या कुसुम अलाम (गोंदिया ) यांनी केले. निमगाव सावा, ता. जुन्नर येथील श्री पांडुरंग ग्रामीण प्रतिष्ठान दिलीप वळसे पाटील कला आणि वाणिज्य महाविद्यालयात आयोजित ‘ महिला सक्षमीकरण : वर्तमान स्थिती, आव्हाने आणि संधी ‘ या विषयावरील राष्ट्रीय चर्चासत्रातील बीजभाषण प्रसंगी त्या बोलत होत्या . अध्यक्षस्थानी श्री पांडुरंग ग्रामीण विकास प्रतिष्ठान संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पांडुरंग पवार होते.महिला शक्ति आणि सक्षमीकरणाचे वास्तव अधिक विस्ताराने मांडताना अलाम पुढे म्हणाल्या, ‘ शेती, मातृसत्ताक व्यवस्था अशा स्थित्यंतरातून बळकट मनोवस्थेतील स्री प्रत्यक्षात मात्र चुलीतल्या पारंपरिक दास्यत्वातच अडकली अन् अडकवली गेली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ग्रामगीता तसेच सर्वोदयी विचार सरणीतील शिकवणीतून वैयक्तिक जीवनात दिशा मिळाली. सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा मोठेपणा सांगताना त्यांच्या विचारांचे आचरण आणि वैचारिक धाक स्वीकारायला हवेत. देश कर्जबाजारी करुन भीकेवर जगायला लागू नये हे आजच्या सत्ताधाऱ्यांनी लक्षात घ्यावे. आर्थिक महासत्ता हिंसेतून नाही उदयाला येत. स्त्रियांच्या अनुभवाचं शहाणपण समाजमन घडवते.’ चर्चासत्राचे उद्घाटक साहित्यिक आणि अकोले अगस्ती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भास्कर शेळके उद्घाटनपर विचार व्यक्त करताना म्हणाले,’ स्त्रियांच्या संदर्भात पुरुष प्रधान व्यवस्थेने मानसिकता बदलणे गरजेचे आहे.स्रीचे संस्कार समाजाला मार्गदर्शक राहिले आहे. संस्कार संस्कृती घडवतात. विद्या आजमितीस केवळ विद्यापीठात राहिली नसून चंगळवाद अन् सहनशीलतेवरील अत्याचार थोपवणे आवश्यक आहे. स्रीला विकासकार्यात संधी मिळणे हा तिचा हक्क आहे. महिलांचे कर्तृत्व आणि कर्तबगारी सिद्ध होताना दिसली की चारित्र्यावर प्रहार होताना दिसतात याची खंत वाटते. विवेकाने वागणे हा खरा धर्म असून अविवेकी वर्तन हा झाला अधर्म. संत जनाबाई, संत मुक्ताईची परंपरा संस्कार संस्कृती शिकवते. महिलांनी सातत्याने त्याग तसेच सत्याचा धर्म शिकवला आहे. साहित्यिक वैचारिक धुरिण इरावती कर्वे यांच्या ‘ परिपूर्ती ‘ ग्रंथाने सशक्त समाजमनाची दिशा दिली आहे. चर्चासत्राचे प्रमुख पाहुणे, साहित्यिक, अगस्ती महाविद्यालयाचे निवृत्त उपप्राचार्य डॉ. सुनील शिंदे जुन्नर तसेच अकोले तालुक्यातील महिला सक्षमीकरणाचा मागोवा घेताना म्हणाले, ‘ क्रांतीबा महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांनी पुण्याबाहेरील महाराष्ट्रातला स्त्रीशिक्षणाच्या विस्ताराचा पहिला प्रयोग जुन्नर तालुक्यातून ओतूरमधील मुलींच्या शालेय शिक्षणाच्या माध्यमातून प्रभावीपणे केला.शिक्षणाची प्रभावी अंमलबजावणी आणि मुहूर्तमेढ ओतूरमधील प्रयोगशील उपक्रमातून विस्तारली. शेती, रोजगार, स्वावलंबन यासाठी महिला सक्षमीकरणाची कृतीशील योजना स्वराज्याच्या प्रयोगातून करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला ही बाब महाराष्ट्रासाठी भूषणावह आहे.अकोले तालुक्यातील आदिवासी वाड्यापाड्यांतून कृषी क्षेत्रात योगदान देणाऱ्या सीडमदर पद्मश्री राहीबाई तसेच फूडमदर ममता भांगरे यांचे योगदान अनमोल आहे. ‘प्रास्ताविक आणि स्वागतपर मनोगत व्यक्त करताना दिलीप वळसे पाटील कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य प्रल्हाद शिंदे यांनी चर्चा सत्राचे समावेशक उद्दिष्ट आणि महिला सक्षमीकरणाची महाविद्यालयीन स्तरावरील कृतीशील दिशा स्पष्ट केली.श्री पांडुरंग ग्रामीण विकास प्रतिष्ठान संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पांडुरंग पवार यांच्या हस्ते निमगाव सावा परिसरातील विविध क्षेत्रातील उपक्रमशील महिलांचा सन्मानपत्र आणि ग्रंथ भेट देऊन गौरव करण्यात आला.याप्रसंगी पुणे जिल्हा परिषद सदस्य स्मिता कणसे,जुन्नर पंचायत समिती सभापती कमल शेळकंदे, प्रा.धनश्री कोळगे – शिर्डी, तसेच प्रा . विशाल हासे, डॉ. सुनील घनकुटे, संस्था अध्यक्ष संदीपान पवार, डॉ. अरुणा वाघोले, डॉ. सुलभा गुंजाळ, डॉ. स्मिता निचित, डॉ. कुंदा कवडे, प्रा. प्रणिता सदावर्ते यांच्यासह विविध महाविद्यालयातील २० महिला प्राध्यापिका, जुन्नर तालुक्यातील महिला सरपंच, विविध संस्थावरील कर्तृत्वान महिला पदाधिकारी, संस्था पदाधिकारी आणि विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच ग्रामस्थ, महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी संस्था प्रतिनिधी कविता पवार यांनी कर्तृत्ववान महिलांमुळे इतिहास घडतो. त्यांच्या यथोचित सन्मान करण्याचा योग संस्था व महाविद्यालयास लाभला.या कार्यक्रमास उपस्थित सर्व महिला, प्रमुख मान्यवर यांचे आभार मानून महाविद्यालयाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी महिला सन्मान सोहळा व राष्ट्रीय चर्चासत्राचे उत्तम नियोजनाबद्दल कौतुक केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!