समर्थ अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये राज्यस्तरीय कार्यशाळा संपन्न

1 min read

बेल्हे दि.२५:- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे व समर्थ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट,बेल्हे यांच्या संयुक्त विद्यमाने ‘गुणवत्ता सुधार योजने’ अंतर्गत ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी या विषयावर एकदिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी विद्यार्थ्यांना तज्ञ मार्गदर्शक म्हणून विषयतज्ञ डॉ.शीतल गिरमे उपस्थित होत्या.संस्थेचे विश्वस्त वल्लभ शेळके यांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजन करून एकदिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यशाळेमध्ये पुणे, अहिल्यानगर, नाशिक विभागातील अभियांत्रिकी महाविद्यालये, बाबासाहेब आंबेडकर तांत्रिक विद्यापीठ लोणेरे कार्यरत शिक्षक वर्ग तसेच औद्योगिक क्षेत्रातील बहुसंख्य कर्मचाऱ्यांनी उस्फूर्तपणे सहभाग नोंदवला. सध्या डिजिटल युगात माहिती सुरक्षित ठेवणे आणि आर्थिक व्यवहार पारदर्शक पद्धतीने करणे ही मोठी गरज बनली आहे. या पार्श्वभूमीवर ‘ब्लॉकचेन’ हे तंत्रज्ञान माहिती साठवण्याचे अत्यंत सुरक्षित आणि आधुनिक माध्यम म्हणून पुढे येत आहे. भविष्यात इंटरनेट वापरण्याची पद्धत बदलण्याची क्षमता या तंत्रज्ञानात असल्याचे संस्थेचे विश्वस्त वल्लभ शेळके यांनी सांगितले.डॉ.शीतल गिरमे यांनी ब्लॉकचेन तंत्रज्ञान आणि त्याचे विविध प्रत्यक्ष जीवनातील अनुप्रयोग या विषयावर सखोल आणि माहितीपूर्ण मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना ब्लॉकचेन प्रणालीची मूलभूत संकल्पना, विकेंद्रीत रचना, डेटा सुरक्षितता आणि पारदर्शक व्यवहारांची प्रक्रिया याबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच प्रात्यक्षिक सादरीकरणाद्वारे ब्लॉकचेन नेटवर्कमध्ये व्यवहार कसे नोंदवले जातात, ब्लॉक्स कशा प्रकारे तयार होतात आणि ते साखळीप्रमाणे कसे जोडले जातात याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक सादर केले. त्यांनी बँकिंग, पुरवठा साखळी व्यवस्थापन, डिजिटल व्यवहार, स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट्स आणि ई-गव्हर्नन्स यांसारख्या विविध क्षेत्रांमध्ये ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर कसा होत आहे याची प्रात्यक्षिकांसह माहिती दिली. ब्लॉकचेन तंत्रज्ञानाची विकेंद्रीत रचना ही त्याची मुख्य वैशिष्ट्ये मानली जातात. माहिती एका ठिकाणी न साठवता हजारो संगणकांवर एकाच वेळी साठवली जाते. त्यामुळे पारदर्शकता वाढते आणि फसवणुकीची शक्यता कमी होते. तसेच प्रगत क्रिप्टोग्राफीमुळे माहितीचे संरक्षण अधिक मजबूत होते. या तंत्रज्ञानाचा वापर केवळ डिजिटल चलन व्यवहारांपुरता मर्यादित नसून बँकिंग-वित्त, शेतीतील पुरवठा साखळी व्यवस्थापन, स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट्सद्वारे करारांची अंमलबजावणी तसेच मतदान प्रणालीमध्ये पारदर्शकता आणण्यासाठीही केला जात आहे. त्यामुळे येत्या काळात ब्लॉकचेन विविध क्षेत्रांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे मत प्राचार्य डॉ. नवनाथ नरवडे यांनी व्यक्त केले. यावेळी अध्यक्ष वसंत शेळके, उपाध्यक्ष माऊली शेळके, सचिव विवेक शेळके,अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.नवनाथ नरवडे,प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदीप गाडेकर, विभागप्रमुख प्रा.निर्मल कोठारी,प्रा.अमोल खतोडे,प्रा.अमोल भोर,डॉ.चौधरी,प्रा.निलेश नागरे,प्रा.शुभम शेळके उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सचिन पोखरकर यांनी तर आभार कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विभागप्रमुख प्रा.स्नेहा शेगर यांनी मानले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!