महसूलच्या अधिकाऱ्यांनी परस्पर दीड लाख शेतकऱ्यांचे सातबारा उतारे बदलले? महसूलमंत्र्यांची विधानपरिषदेत कबुली
1 min read
मुंबई दि.१९:- राज्यातील महसूल विभागात सगळ्यात मोठा घोटाळा झाल्याची माहिती खुद्द महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानपरिषद सभागृहात दिली आहे. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी थेट विधान परिषदेत ही कबुली दिल्याने राज्यात एकच खळबळ उडाली आहे.
शुद्धलेखनात बदल करण्याच्या नियमाखाली अधिकाऱ्यांनी सातबारा उताऱ्यात बदल केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. आतापर्यंतच्या इतिहासात महसूल खात्यात झालेला हा सगळ्यात मोठा घोटाळा असल्याचं देखील मंत्री बावनकुळे यांनी कबूल केलं आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे आतापर्यंतच्या इतिहासात महसूल खात्यात झालेला हा सगळ्यात मोठा घोटाळा असल्याचंही मंत्री बावनकुळे यांनी म्हटलं आहे. राज्यातील तब्बल एक ते दीड लाख शेतकऱ्यांची महसूल विभागाच्या कलम 155 अंतर्गत अधिकाऱ्यांनी फसवणूक केल्याची जाहीर कबुली बावनकुळेंनी दिली आहे.
तब्बल एक ते दीड लाख शेतकऱ्यांची महसूल विभागाच्या कलम 155 अंतर्गत अधिकाऱ्यांनी केलेल्या फसवणुकी प्रकरणी आता आम्ही सगळीकडे तपास करण्याचे आदेश दिल्याची माहितीही महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली आहेत. पण अधिवेशन संपायच्या आत दोषींवर कारवाई करू असं आश्वासन मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात दिलं.
शिवसेना ठाकरे गटाचे विधान परिषदेचे आमदार अनिल परब यांनी महसूल खात्यातील घोटाळ्या संबंधीची लक्षवेधी मांडली. अधिकाऱ्यांनी राज्यातील शेतकऱ्यांच्या सात-बारावर फेरफार करून सर्वात मोठा घोटाळा केल्याचा आरोप त्यांनी केला.
ते म्हणाले की, महाराष्ट्रात भ्रष्टाचारात कोणत्या खात्याला पहिला नंबर द्यायचा यामध्ये स्पर्धा लागली आहे. महसूल कायद्याने जे अधिकार दिले जातात त्यामध्ये विविध कलमे देण्यात आली आहेत. ज्यामध्ये अधिकाऱ्यांना त्याचे अधिकार मिळतात.
अधिकारी बऱ्याच वेळा चुका दुरुस्त करण्यासाठी कलमांचा वापर करतात. त्यामुळे फेरफार करतात हेच आणि दुरुस्ती देखील हेच करतात. यामुळे ज्यावेळी शेतकरी फेरफार दुरुस्तीसाठी जातो त्यावेळी त्याला हे अधिकारी रखडतात. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले कि, मी या खात्याचा मंत्री झालो
तेव्हा अनेक तक्रारी माझ्याकडे आल्या. कलम 155 चा दुरुपयोग केला जात आहे. महसूल खात्यात आतापर्यंत सर्वात मोठी अनियमितता झाली आहे. जेवढा 155 चा दुरुपयोग केला ते दुरुस्त करा. पुढच्या 7 दिवसात कारवाई करू आणि पुढच्या अधिवेशनात संपूर्ण चित्र सभागृहात दिसेल
आणि कितीही मोठा अधिकारी असेल त्याच्यावरही कारवाई होईल. मी महसूलमंत्री आहे. मुख्यमंत्री यांच्याशी मी चर्चा केली. या अधिकाऱ्यांचं करायचं काय, याबाबत पुढील काही दिवसात कारवाई होईल, असंही बावनकुळे म्हणाले.
