पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर एअरस्ट्राईक; ४०० जणांचा मृत्यू

1 min read

काबूल दि.१७:- गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यामध्ये हल्ले-प्रतिहल्ले होत आहेत. आता यामध्ये आणखी भर पडली आहे. पाकिस्तानने रमजान महिना सुरू असतानाच अफगाणिस्तानमधील काबूलमध्ये मध्यरात्री एअरस्ट्राईक केला आहे. काबूलमधील एका नशामुक्ती केंद्रावर पाकिस्तानने बॉम्बहल्ला केला आहे. यामध्ये उपचार घेत असलेल्या ४०० जणांचा मृत्यू झाला, तर २५० जण गंभीर जखमी आहेत. या एअरस्ट्राईकनंतर अफगाणिस्तानमध्ये संतापाचे वातावरण आहे. तालिबान सरकारने पाकिस्तानला गंभीर इशारा दिला असून, याची किंमत मोजावी लागेल, आता कोणतीही चर्चा होणार नाही, असे स्पष्ट शब्दांत खडसावले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानने काबुलमधील एका रुग्णालयाला लक्ष्य करून हवाई हल्ला केला. तालिबानच्या एका प्रवक्त्याने सांगितलं की, काबुलमधील एका रुग्णालयाच्या आवारातच असलेल्या ‘नशामुक्ती केंद्रा’ वर पाकिस्तानने हवाई हल्ला केला.यात किमान ४०० लोकांचा मृत्यू झाला असून, सुमारे २५० लोक जखमी झाले आहेत. काबूलमध्ये सध्या बचावकार्य जोरात सुरू असून, निवासी भाग आणि रुग्णालयाच्या ढिगाऱ्याखालून मृतदेह बाहेर काढण्याचे आणि जिवंत वाचलेल्या लोकांना सुखरूप बाहेर काढण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत. पाकिस्तानी हवाई दलाने वापरलेल्या अत्यंत शक्तिशाली स्फोटकांमुळे, संरक्षण मंत्रालय आणि GDI मुख्यालया जवळील संपूर्ण आकाश आगीच्या ज्वाळांनी व्यापून गेले होते.अफगाणिस्तानचे प्रवक्ते जबीहुल्लाह मुजाहिद यांनी पाकिस्तानला कडक इशारा दिला आहे की, “पाकिस्तान सोबत आता कोणतीही चर्चा होणार नाही, या हल्ल्याचा बदला घ्यावाच लागेल.” दरम्यान, अफगाणिस्तानमधील संयुक्त राष्ट्रांचे प्रतिनिधी रिचर्ड बेनेट यांनी नशामुक्ती केंद्रावरील हल्ल्यात झालेल्या नागरिक जीवितहानीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. बेनेट यांनी पीडितांच्या कुटुंबीयां प्रति सहानुभूती व्यक्त करत दोन्ही देशांतील तणाव कमी करण्याचे, तसेच नागरिक आणि रुग्णालयांसारख्या सार्वजनिक सुविधांचे संरक्षण करण्यासह आंतरराष्ट्रीय कायद्यांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे, असे वृत्त ‘टोलो न्यूज’ने दिले आहे. आंतरराष्ट्रीय मानवाधिकार फाउंडेशननेही या हल्ल्याचा निषेध केला असून, रुग्णालये आणि उपचार केंद्रांसारख्या सार्वजनिक सुविधांना कधीही लक्ष्य केले जाऊ नये, यावर भर दिला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!