बीडचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे प्रकरणात नवा ट्विस्ट; मोडनिंबमधील ‘स्वरांजली कला केंद्रा’ वर धाड, सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
1 min read
बीड दि.१७:- बीड येथील माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी एका नर्तिकेच्या नादात आपले संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करून घेतले होते. यानंतर त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे एका कारमध्ये स्वतःचे जीवन दुर्दैवीरीत्या संपवले. या घटनेमुळे संपूर्ण राज्यात मोठी खळबळ उडाली होती.
आता याच प्रकरणाशी संबंधित एक मोठी आणि खळबळजनक माहिती समोर आली आहे. सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील मोडनिंब येथे पोलीस ठाण्यापासून अवघ्या काही मीटर अंतरावर सुरू असलेल्या एका भयानक सेक्स रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.
टेंभुर्णी पोलिसांनी १५ मार्च रोजी स्वरांजली कला केंद्र या नावाखाली चालणाऱ्या वास्तूवर छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी तब्बल २५ तरुणींची सुटका केली आहे. या प्रकरणी एका महिलेसह एकूण पाच जणांवर मानवी तस्करी आणि अनैतिक व्यापाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, गोविंद बर्गे प्रकरणात जिचे नाव समोर आले होते, ती नर्तिका पूजा गायकवाड हिचाही या रॅकेटमध्ये थेट संबंध असल्याचे उघड झाले आहे. पूजा गायकवाड हिने यापूर्वीच पोलिसांसमोर गोविंद बर्गे यांच्याशी आपले संबंध असल्याची स्पष्ट कबुली दिली होती
आणि ती सध्या पोलीस कोठडीत आहे. मात्र, तीच नर्तिका मोडनिंब येथील कला केंद्रात वेश्याव्यवसायात अडकलेली असल्याचे आता समोर आले आहे.
या स्वरांजली कला केंद्रात केवळ मनोरंजनाच्या नावाखाली काळे धंदे राजरोस पणे सुरू होते. येथे अनेक हौशे आणि धनदांडग्यांची गर्दी असायची.
नर्तिकेचा डान्स दाखवण्याच्या बहाण्याने या तरुणींना वेश्याव्यवसायाच्या गर्तेत ढकलले जात होते. बाहेरून आणलेल्या या तरुणींना तिथे कोंडून ठेवून त्यांच्याकडून अनैतिक कामे करवून घेतली जात होती. या ठिकाणी सर्रासपणे हाय प्रोफाईल अश्लील पार्ट्यांचे आयोजन होत असल्याचे समोर आले आहे.
पोलिसांनी टाकलेल्या धाडीत मोठ्या प्रमाणात अश्लील साहित्य,मोबाईल फोन आणि महत्त्वाची रेकॉर्डिंग डिव्हाइसेस जप्त करण्यात आले आहेत. पोलीस ठाण्या जवळच हा प्रकार सुरू असूनही कित्येक महिने कोणाला याची भणक कशी लागली नाही,
हा प्रश्न उपस्थित होत आहे. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून मुख्य सूत्रधारांसह आणखी काही आरोपींना लवकरच बेड्या ठोकल्या जातील, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
