सातारा वनविभागाची मोठी कारवाई: उंब्रज परिसरात धाडी टाकून २५ लाखांहून अधिकचा अवैध लाकूड साठा जप्त
1 min read
सातारा दि.१४:- सातारा वनविभागाच्या दक्षता पथकाने कराड तालुक्यातील उंब्रज आणि लगतच्या गावांमध्ये अवैध लाकूड साठ्यावर मोठी कारवाई केली आहे. मौजे उंब्रज, कळंत्रेवाडी, शिवडे आणि कोर्टी या चार ठिकाणी ७ आणि ८ मार्च २०२६ रोजी टाकलेल्या धाडींमध्ये सुमारे २६ लाख रुपयांहून अधिक किमतीचा साग, रायवळ आणि जळाऊ लाकूड साठा जप्त करण्यात आला आहे.
मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे वनक्षेत्रपाल (संरक्षण व अतिक्रमण निर्मूलन) सातारा आणि वनपरिक्षेत्र अधिकारी कराड यांच्या अधिनस्त कर्मचारी व अधिकाऱ्यांनी ही संयुक्त मोहीम राबवली. या कारवाईत ९८.४४९ घनमीटर आकारमानाचे एकूण १२८३ साग व रायवळ प्रजातीचे अनगड नग जप्त करण्यात आले,
ज्याची बाजारपेठीय किंमत २५,२७,८७२/- रुपये इतकी आहे. याशिवाय, कळंत्रेवाडी व शिवडे येथून ७९,१०३/- रुपये किमतीचा ६१.२७५ घनमीटर जळाऊ लाकूड साठाही ताब्यात घेण्यात आला आहे. भारतीय वन अधिनियम,१९२७ च्या कलम ४१ (२) (ब) अन्वये या प्रकरणी एकूण ४ वनगुन्हे नोंदवण्यात आले असून,
हा लाकूड साठा कोठून आणला आणि तो कोठे जाणार होता,याचा अधिक तपास सध्या कराड वनपरिक्षेत्र अधिकारी करत आहेत.सदरची यशस्वी कारवाई सातारा वनविभागाचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते (भा.व.से.), विभागीय वनअधिकारी (दक्षता) कोल्हापूर संजय वाघमोडे आणि सहाय्यक वनसंरक्षक जयश्री जाधव यांच्या
मार्गदर्शनाखाली पार पडली. या मोहिमेत वनक्षेत्रपाल गणेश महांगडे, ललिता पाटील, वनपाल डी.डी. बोडके, आनंद जगताप, वनरक्षक सचिन खंडागळे, जाधवर, रामेश्वर घुले, अश्विनी नागवे, प्रकाश वाघ आणि दिनेश नेहरकर यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.या निमित्ताने उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की,
अवैध वृक्षतोड आणि त्याची वाहतूक करणे हा कायद्याने गुन्हा असून त्यासाठी १ वर्षाचा कारावास किंवा दंडाची तरतूद आहे. निसर्गाचा ऱ्हास होणाऱ्या अशा कृत्यांमध्ये नागरिकांनी सहभागी होऊ नये आणि अशा प्रकारच्या अवैध हालचालींची माहिती मिळाल्यास तातडीने वनविभागाशी संपर्क साधावा, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
