धक्कादायक! जुन्नर येथे तरुणीवर हल्ला करणाऱ्या आरोपीची आत्महत्या
1 min read
जुन्नर दि.१३:- जुन्नर येथील शासकीय आदिवासी मुलींच्या
वसतिगृहातील तरुणीवर लग्नाच्या कारणावरून कोयत्याने हल्ला करणाऱ्या महेश डामसे याने गणेशखिंड परिसरातील जंगलात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे गुरूवारी (दि. १२) पोलीस तपासात निष्पन्न झाले.
बुधवारी (दि.११) सकाळी दहाच्या सुमारास गौरी सावळे (वय १८) हिच्यावर जीवघेणा हल्ला करून तो दुचाकीवरून पसार झाला होता, तेव्हापासून पोलीस पथके त्याचा कसून शोध घेत होती.स्थानिक पुणे ग्रामीण गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, महादेव शेलार, दीपक साबळे व संदीप वारे यांनी जुन्नर
ते गणेशखिंड परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरणाची तपासणी केली असता आरोपी महेश या भागात आल्याचे स्पष्ट झाले. अधिक तपास केला असता गणेशखिंड येथील गणपती मंदिराजवळील दरीतील जंगलात त्याची दुचाकी
सापडली. त्यानंतर काही अंतरावरच एका झाडाला दोरीने गळफास घेतलेल्या स्थितीत त्याचा मृतदेह आढळून आला.
घटनेचे गांभीर्य पाहून त्याने बुधवारीच आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.मृत महेश डामसे आणि जखमी तरुणी गौरी हे दोघेही आदिवासी भागातील आंबे गावचे रहिवासी आहेत.
भरदिवसा घडलेल्या या थरारक घटनेचा आणि त्यानंतर आरोपीच्या आत्महत्येचा जुन्नर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलीस याप्रकरणी पुढील कायदेशीर प्रक्रिया पार पाडत आहेत.
