राजुरी येथे जागतिक महिला दिनानिमित्त प्रत्यंगिरा चंडीपाठाचे आयोजन

1 min read

राजुरी दि.१०:- श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास बालसंस्कार केंद्र, राजुरी येथे जागतिक महिला दिनानिमित्त आगळावेगळ्या पद्धतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.भारतमातेच्या संरक्षणासाठी तसेच जगावर येणाऱ्या संकटांवर मात करण्यासाठी सर्व महिला सेवेकऱ्यांनी एकत्र येत परमपूज्य गुरुमाऊलींच्या आदेशानुसार प्रत्यंगिरा चंडीपाठ संपन्न केला.या कार्यक्रमामध्ये सुमारे ८० ते १०० महिला सेवेकऱ्यांची उपस्थिती लाभली. विशेष म्हणजे बाहेर आनंदोत्सव साजरा करण्याऐवजी देशासाठी काहीतरी योगदान द्यावे, या भावनेतून महिलांनी भक्तीमय वातावरणात हा उपक्रम पार पाडला. राजुरी, उंचखडक व बेल्हे येथून अनेक सेवेकरी यावेळी उपस्थित होते.सकाळी साडेदहा वाजता नैवेद्य आरतीनंतर प्रत्यंगिरा चंडीपाठाला सुरुवात झाली. पाठ संपन्न झाल्यानंतर उपस्थित महिलांसाठी लकी ड्रॉ आयोजित करण्यात आला. यामध्ये संगीता गुंजाळ (प्रथम), ललिता कणसे (द्वितीय) आणि आदिका बांगर (तृतीय) या भाग्यवान महिलांना साडी भेट देण्यात आली.उपस्थित सर्व सेवेकऱ्यांसाठी आणे येथील सुप्रसिद्ध आमटी-भाकरी जेवणाचे नियोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मयूर शिंदे यांनी केले. उत्तर पुणे जिल्हा प्रतिनिधी सारिका शेळके यांनी सर्वांचे आभार मानले. या कार्यक्रमासाठी राजुरी सेवा केंद्राच्या पंचकमिटीचे सर्व सदस्य तसेच कार्यरत सेवेकरी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व सेवेकऱ्यांचे श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र, राजुरी यांच्या वतीने आभार मानण्यात आले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!