‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ मालिकेच्या सेटवर महिला दिनानिमित्त सर्व महिला कलाकार व तंत्रज्ञांचा डॉ.अमोल कोल्हे यांच्या हस्ते सत्कार
1 min read
पुणे दि.९:- आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ च्या सेटवर विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी मालिकेचे निर्माते डॉ. अमोल कोल्हे यांनी मालिकेत काम करणाऱ्या सर्व महिला कलाकार, तंत्रज्ञ, तसेच सपोर्ट स्टाफ यांचा सन्मान करून त्यांचे योगदान गौरवले.
महिलांच्या सक्षमीकरणाचा संदेश देणारी ही मालिका समाजसुधारक क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रेरणादायी जीवनावर आधारित आहे. भारतातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सावित्रीबाई फुले यांनी मुलींच्या शिक्षणासाठी आणि स्त्रीसमानतेसाठी मोठे योगदान दिले.
त्या काळात समाजातील अनेक अडथळ्यांना सामोरे जात त्यांनी स्त्रियांच्या शिक्षणाची चळवळ उभी केली आणि महिलांना स्वाभिमानाने जगण्याचा मार्ग दाखवला.याच प्रेरणादायी वारशाला अभिवादन करण्यासाठी महिला दिनाच्या निमित्ताने मालिकेच्या सेटवर काम करणाऱ्या सर्व महिलांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमात महिला कलाकारांबरोबरच कॅमेरा, मेकअप, वेशभूषा, निर्मिती विभाग आणि इतर तांत्रिक विभागांमध्ये काम करणाऱ्या महिलांच्या मेहनतीची दखल घेण्यात आली. निर्माते डॉ. अमोल कोल्हे यांनी यावेळी सांगितले की, “सावित्रीबाई फुले यांनी सुरू केलेल्या स्त्रीशिक्षण आणि स्त्रीसक्षमीकरणाच्या विचारांचा आजही समाजावर मोठा प्रभाव आहे.
‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ ही मालिका त्या विचारांना नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे काम करत आहे. महिला दिनानिमित्त मालिकेच्या सेटवर काम करणाऱ्या सर्व महिलांचा सन्मान करणे हा आमच्यासाठी अभिमानाचा क्षण आहे.”
या विशेष उपक्रमामुळे सेटवरील सर्व महिलांना प्रोत्साहन मिळाले असून सावित्रीबाई फुले यांच्या विचारांना अभिवादन करत आंतरराष्ट्रीय महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
