महाराष्ट्रातील ६० पेक्षा जास्त उमेदवार यूपीएससी परीक्षेत यशस्वी

1 min read

मुंबई दि.७:- केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षा 2025 चा अंतिम निकाल जाहीर झाला असून यंदाही महाराष्ट्रातील तरुणांनी आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. या परीक्षेत देशातील एकूण 958 उमेदवार यशस्वी झाले असून त्यामध्ये महाराष्ट्रातील 60 हून अधिक उमेदवारांचा समावेश आहे. निकालात पहिल्या 100 यशस्वी उमेदवारांच्या यादीत महाराष्ट्रातील 5 गुणवंतांनी स्थान मिळवले आहे. शुक्रवारी जाहीर झालेल्या या निकालामुळे राज्यातील यशस्वी उमेदवारांच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण पसरले आहे. यंदाच्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत जोधपूरच्या अनुज अग्निहोत्री याने देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. अनुजने MBBS चे शिक्षण पूर्ण केले असून त्याने 2023 पासून या परीक्षेची तयारी सुरू केली होती. अल्पावधीतच त्याने आपल्या मेहनतीच्या जोरावर देशात अव्वल येण्याचा बहुमान मिळवला आहे. देशातील पहिल्या 100 उमेदवारां मध्ये महाराष्ट्राच्या हृषिकेश आलासे याने 61 वा क्रमांक मिळवून राज्यातून प्रथम येण्याचा मान मिळवला आहे.त्यापाठोपाठ आकाश त्रिवेदी (73), गौरव चोप्रा (83), सायली पगार (87) आणि दीक्षा पाटकर (88) या उमेदवारांनी पहिल्या शंभरात स्थान मिळवले आहे. महाराष्ट्रातील ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागातील उमेदवारांनी या निकालात बाजी मारली आहे. प्रशासकीय सेवेत जाण्याचे स्वप्न उराशी बाळगून सातत्याने अभ्यास करणाऱ्या या तरुणांनी राज्याचा गौरव वाढवला आहे. यामध्ये अनेक मुलींनीही घवघवीत यश संपादन केले असून शेवटच्या क्रमांकापर्यंत महाराष्ट्राचे उमेदवार यादीत पाहायला मिळत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यशस्वी उमेदवारांचे अभिनंदन केले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!