शिवरायांचे विचार अंगीकारणे हीच काळाची गरज:-शिवव्याख्याती सुचेता भिसे

1 min read

पौड/तिकोणा पेठ दि.७:- “छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ इतिहासातील राजा नसून ते व्यवस्थापन आणि नीतिमत्तेचा आदर्श आहेत. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात वावरणाऱ्या नव्या पिढीने महाराजांचे युद्धकौशल्य, स्त्रियां बद्दलचा आदर आणि अष्टप्रधान मंडळासारखे प्रशासन अभ्यासायला हवे. शिवविचार केवळ भाषणात न ठेवता ते आचरणात आणणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल,” असे प्रतिपादन प्रसिद्ध शिवव्याख्याती सुचेता जयश्री विजयकुमार भिसे यांनी केले.
‘समस्त ग्रामस्थ तिकोणा पेठ’ यांच्या वतीने आयोजित ‘भव्य शिवजन्मोत्सव सोहळा २०२६’ निमित्त आयोजित व्याख्यानात त्या बोलत होत्या. ६ मार्च रोजी ऐतिहासिक तिकोणा किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या तिकोणा पेठ येथे हा सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला.दिवसभर विविध कार्यक्रमांची रेलचेल सोहळ्याची सुरुवात पहाटे किल्ले तिकोणा ते गावठाण अशा काढण्यात आलेल्या भव्य ‘शिवज्योत’ रॅलीने झाली. सकाळी भैरवनाथ मंदिर प्रांगणात श्रींच्या मूर्तीचा अभिषेक, पूजा आणि आरती करण्यात आली. सायंकाळी पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि ‘साईरत्न ऑडिओ’च्या ठेक्यावर शिवरायांची पालखी व मिरवणूक काढण्यात आली,ज्यामध्ये अबालवृद्धांनी मोठा सहभाग नोंदवला. नव्या पिढीला साद सुचेता भिसे यांनी आपल्या व्याख्यानातून शिवचरित्रातील विविध पैलू उलगडून दाखवले. “मुलांवर जिजाऊंसारखे संस्कार झाल्यास प्रत्येक घरात शिवबा घडेल,” असे सांगत त्यांनी व्यसनमुक्ती आणि गड-किल्ल्यांचे संवर्धन यावर तरुणांना शपथ दिली. त्यांच्या ओघवत्या शैलीतील मार्गदर्शनाने उपस्थित शिवभक्त मंत्रमुग्ध झाले होते.रात्री मावळ आणि मुळशी येथील वारकरी संप्रदायाचा ‘भजन’ कार्यक्रम संपन्न झाला. तत्पूर्वी सर्व ग्रामस्थांसाठी ‘शिवभोजन’ (महाप्रसाद) आयोजित करण्यात आले होते. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी तिकोणा पेठेतील सर्व तरुण मंडळ आणि ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले. परिसरातील शेकडो शिवप्रेमींच्या उपस्थितीने तिकोणा पेठ शिवमय झाली होती.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!