राज्यात उन्हाचा चटका अधिक तीव्र
1 min read
मुंबई दि.४:- राज्यात थंडी संपून उष्णतेत मोठ्या प्रमाणात वाढ होऊ लागली आहे. देशातील उंच्चाकी तापमानाची नोंद अकोल्यात झाली. अकोला येथे ३८.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. मुंबईसह कोकणातही उष्णता आणि दमट वातावरण बघायला मिळत आहे.
भारतीय हवामान विभागाने उष्ण आणि दमट हवामानाचा येलो अलर्ट राज्यातील काही भागात दिला. मागच्या आठवड्यात राज्यात अवकाळी पाऊस झाला. गारठा काही प्रमाणात जाणवत होता. मात्र, आता कडाक्याचे उष्णता बघायला मिळत आहे. दुपारच्या वेळी ऊन अधिक जाणवत आहे.
वाढत्या उन्हामुळे आणि तापमानामुळे डिहायड्रेशन आणि उष्माघाताचा धोका वाढतो आहे. यासाठी प्रशासनाने नागरिकांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. नागरिकांनी शक्यतो दुपारी १२ ते ४ या वेळेत थेट उन्हात जाणे टाळा.
शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी भरपूर पाणी आणि लिंबू सरबत, ताक यांसारख्या पेयांचे सेवन करा. बाहेर पडताना सुती आणि हलक्या रंगाचे कपडे परिधान करा. लहान मुले आणि वृद्धांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या, असे आवाहन करण्यात येत आहे.
मुंबईसह संपूर्ण कोकण पट्ट्यात सध्या उष्ण आणि दमट हवामानाचा प्रभाव असल्याचं दिसून येत आहे. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत बुधवारी आणि गुरुवारी हवेतील आर्द्रता वाढल्याने अस्वस्थता अधिक जाणवेल.
मुंबईचे तापमान कमाल २९ ते ३२ अंश सेल्सियस आणि किमान २४ ते २६ अंश सेल्सियसच्या दरम्यान राहण्याचा अंदाज आहे. समुद्रकिनारी असलेल्या भागांत दमट हवामान असेल आणि उन वाढल्याने उन्हाचा चटका जाणवण्याची शक्यता आहे.
