मराठी भाषा गौरव दिन उत्साहात संपन्न

1 min read

आळेफाटा दि.४:- आळे येथील फार्मसी महाविद्यालयात २७ फेब्रुवारी २०२६ रोजी मराठी भाषा गौरव दिन अभिमानाने व उत्साहात साजरा करण्यात आला. मराठी भाषेची समृद्ध परंपरा, साहित्यिक वारसा आणि सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम यशस्वीरीत्या आयोजित करण्यात आला.सदर कार्यक्रम संस्थेचे अध्यक्ष अंकुश सोनवणे तसेच संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. डी. डी. गायकवाड व प्राचार्य प्रा. एस. एल. जाधव यांच्या उपस्थितीत पार पडला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संदीप वाघोले होते. ते एक नामांकित कवी, वक्ते आणि सूत्रसंचालक आहेत.आपल्या भाषणात त्यांनी मराठी भाषेचे जतन व संवर्धन करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी सुप्रसिद्ध साहित्यिक वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांच्या कवितांचे वाचन करून उपस्थितांना प्रेरित केले.त्यांच्या प्रभावी वक्तृत्वाने कार्यक्रमाला विशेष उर्जा मिळाली.कार्यक्रमाची प्रस्तावना प्रा.धनश्री गिते यांनी केली. कुसुमाग्रजांच्या साहित्यिक योगदानाचा विशेष उल्लेख करण्यात आला. त्यांच्या कवितांमधून मराठी भाषेचा अभिमान, संस्कृतीचे वैभव आणि मानवी मूल्ये प्रकट होतात.मराठी भाषा गौरव दिनाचा कार्यक्रम अत्यंत यशस्वी ठरला. विद्यार्थ्यांमध्ये मातृभाषेबद्दल अभिमानाची भावना जागृत झाली. कार्यक्रमाच्या शेवटी प्रा. मयुरी होळकर यांनी उपस्थित मान्यवर, अतिथी, प्राध्यापकवर्ग तसेच विद्यार्थी आयोजकांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!