पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नेतन्याहूसह यूएईच्या अध्यक्षांना फोन; म्हणाले, शत्रुत्व लवकर थांबवा

1 min read

नवीदिल्ली दि.२:- मध्यपूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बेंजामिन नेतान्याहू यांच्याशी फोनवरून संवाद साधलाय. या संभाषणादरम्यान त्यांनी या प्रदेशात लवकर युद्धबंदीची गरज असल्याचे अधोरेखित केलं. पंतप्रधान मोदींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर लिहिले की त्यांनी सध्याच्या परिस्थितीवर चर्चा केली आणि नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. त्यांनी सांगितले की भारत लवकर शांतता प्रस्थापित करण्याचे आणि हिंसाचार थांबवण्याचे आवाहन केल्याचं सांगितलं. दरम्यान, पंतप्रधान मोदींनी संयुक्त अरब अमिराती (UAE) चे अध्यक्ष मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांच्याशीही संवाद साधला. त्यांनी UAE वरील हल्ल्यांचा तीव्र निषेध केला आणि जीवित आणि मालमत्तेच्या नुकसानाबद्दल शोक व्यक्त केला. मोदी म्हणाले की, या कठीण काळात भारत UAE सोबत उभा आहे आणि तेथे राहणाऱ्या भारतीयांच्या सुरक्षिततेची खात्री केल्याबद्दल त्यांचे आभार मानतो.असेही ते म्हणाले.मध्य पूर्वेतील परिस्थिती बिघडत आहे. अमेरिका आणि इस्रायलने संयुक्तपणे इराणला लक्ष्य केल्यामुळे मध्य पूर्वेतील परिस्थिती आणखी बिकट झालीय. इराणी सरकारी माध्यमांनुसार, या घटनेत इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला. संरक्षणमंत्र्यांसह इतर अनेक नेत्यांचाही मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. इराणने इस्रायल आणि इतर अनेक आखाती देशांवर क्षेपणास्त्रे डागून प्रत्युत्तर दिले. इराणच्या या कृतीमुळे संपूर्ण आखाती प्रदेशात मोठे युद्ध होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आंतरराष्ट्रीय समुदाय परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. भारताने या संवेदनशील वेळी शांतता, संवाद आणि प्रादेशिक स्थिरतेला पाठिंबा देत संतुलित दृष्टिकोन स्वीकारला आहे.खामेनी यांच्या मृत्यूनंतर इराणमध्ये 40 दिवसांच्या राष्ट्रीय दुखवट्याची घोषणा करण्यात आली आहे. इस्त्रायल-अमेरिकेच्या हल्ल्यात त्यांच्या कुटुंबातील चार सदस्यांचाही मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. तेहरानमध्ये मोठ्या प्रमाणावर सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली असून या हल्ल्याचा बदला घेण्याच्या घोषणा करण्यात आली आहे. दुसरीकडे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणविरुद्धचे लष्करी अभियान सुरूच राहील, असे स्पष्ट केले आहे. शांतता प्रस्थापित होईपर्यंत अचूक आणि तीव्र बॉम्बहल्ले सुरू राहतील, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स, सशस्त्र सेना आणि पोलिस दलाला शस्त्रे खाली ठेवण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. या घडामोडींमुळे मध्यपूर्वेतील परिस्थिती अधिकच तणावपूर्ण बनली असून जागतिक राजकारणात मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!