खामेनेईच्या मृत्यूनंतर पाकिस्तान पेटला; ८ जणांचा मृत्यू
1 min read
इस्लामाबाद दि.२:- इस्त्रायल आणि अमेरिकेनं इराणवर शक्तीशाली हल्ला केला. या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील अनेक सदस्यांचा मृत्यू झाला आहे.या घटनेनंतर आता इराण देखील आक्रमक झाला असून इराणने अमेरिकन सैनिकी तळं असलेल्या विविध देशांना लक्ष्य केलं आहे.
यामुळे संपूर्ण मध्य पूर्व देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली असून लोकांना जीव मुठीत घेऊन आपलं संरक्षण करावं लागतं आहेत. दुसरीकडे, खामेनेई यांच्या मृत्यूचे पडसाद आता विविध देशांमध्ये उमटू लागले आहेत. जगभरातील शिया समुदाय आक्रमक झाला आहे.
लेबनान, बगदादी याठिकाणी शिया समुदाय आक्रमक झाला असून खामेनेई यांच्या मृत्यूच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरला आहे. याचे पडसाद भारताशेजारी असलेल्या पाकिस्तानात देखील उमटले असून पाकिस्तानमधील शिया समुदायाने कराची येथील अमेरिकन दुतावासावर हल्ला केला आहे.
मोठ्या संख्येनं एकत्र आलेल्या लोकांनी अमेरिकन दूतावासाबाहेर असलेली सुरक्षा व्यवस्था भेदून आतमध्ये प्रवेश केला. हातात लाकडी दांडके, काठ्या, दगड, लोखंडी रॉड घेऊन नागरिकांनी दूतावासाला टार्गेट केलं. कार्यालयाच्या काचा फोडून लोकांनी इमारतीला आग लावली.
या आगीत एकूण ८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आता समोर येत आहे. विशेष म्हणजे, मागील काही दिवसांपासून पाकिस्तान अमेरिकेसोबत आपले संबंध सुधारवण्याचा प्रयत्न करत होता. पाकिस्तानचे पंतप्रधान सातत्याने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या संपर्कात होते.
मात्र आता पाकिस्तानमधील शिया समुदायाचे लोक आक्रमक झाले असून त्यांनी अमेरिकन दूतावासावर हल्ला केला आहे. इराणमधील घटनेचे अशाप्रकारे पाकिस्तानात पडसाद उमटल्याने पाकिस्तान आणि अमेरिका यांच्यातील संबंध बिघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
