मराठी भाषा गौरव दिनानिमित्त वळसे पाटील महाविद्यालयात प्रवचन कार्यक्रम संपन्न
1 min read
निमगाव सावा दि.१:- निमगाव सावा (ता. जुन्नर) मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने श्री पांडुरंग ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित दिलीप वळसे पाटील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणून सुप्रसिद्ध कीर्तनकार व प्रवचनकार ह.भ.प. विजय महाराज खाडे यांचे प्रेरणादायी प्रवचन आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवातीला वि. वा. शिरवाडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन प्रमुख मान्यवरांच्या शुभ हस्ते करण्यात आले. त्यानंतर महाराष्ट्र गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
प्रा. अनिल पडवळ यांनी प्रास्ताविकामध्ये कार्यक्रमाच्या प्रारंभी मराठी भाषेच्या गौरवशाली परंपरेविषयी माहिती दिली.आपल्या प्रवचनात विजय महाराज खाडे यांनी मराठी भाषा ही आपल्या संस्कृतीची ओळख असून तिचे जतन व संवर्धन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे असे सांगितले.
त्यांनी संत साहित्य, वारकरी परंपरा, तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील मराठी भाषेचे महत्त्व यावर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी मातृभाषेचा अभिमान बाळगून तिचा दैनंदिन व्यवहारात वापर करावा असे आवाहन त्यांनी केले. मराठी विभाग प्रमुख प्राचार्य प्रल्हाद शिंदे यांनी मराठी भाषेचा इतिहास,
मराठी भाषेला अभिजात भाषेचा मिळालेला दर्जा, मराठी भाषेचं महत्त्व आपल्या मनोगतातून अधोरेखित केले. कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे अध्यक्ष संदिपान पवार,सचिव परेश घोडे, निमगाव सावाचे माजी उपसरपंच नजीर चौगुले, सामाजिक कार्यकर्ते आणि माजी तंटामुक्ती अध्यक्ष परशुराम लगड,
सामाजिक कार्यकर्त्यां स्नेहा बांगर, संस्थेच्या प्रतिनिधी कविता पवार, प्राचार्य प्रल्हाद शिंदे, सर्व प्राध्यापक आणि प्राध्यापकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेबद्दल प्रेम व अभिमान निर्माण झाला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. नीलम गायकवाड यांनी प्रभावीपणे पार पडले व शेवटी प्रा. सुभाष घोडे यांनी आभार मानून, पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
