दिलीप वळसे पाटील महाविद्यालयात निर्भय कन्या अभियान कार्यशाळा
1 min read
निमगाव सावा दि.१:- श्री पांडुरंग ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित दिलीप वळसे पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथे विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी व सक्षमीकरणा साठी निर्भय कन्या अभियान अंतर्गत एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन शुक्रवार दि.२७ फेब्रुवारी रोजी करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले.प्रा.अनिल पडवळ यांनी प्रास्ताविकामध्ये या कार्यशाळेचा उद्देश विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वास वाढवणे, स्वसंरक्षणाचे मूलभूत ज्ञान देणे व कायदेशीर हक्कांविषयी जागृती करणे हा असल्याचे सांगितले.
निर्भय कन्या अभियान कार्यशाळेच्या प्रमुख मार्गदर्शिका सामाजिक कार्यकर्त्या स्नेहा बांगर यांनी आजच्या काळात मुलींनी निर्भयपणे पुढे जाण्यासाठी अशा अभियानांची आवश्यकता असल्याचे सांगीतले. स्वसंरक्षणाचे तंत्र, महिलांचे कायदेशीर हक्क, सायबर सुरक्षा, तसेच आपत्कालीन परिस्थितीत कसे वागावे याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
तसेच स्वतःला व्यक्तिगत जीवनामध्ये आलेले संकटे व त्याविरुद्ध दिलेला लढा केलेल्या उपाययोजना सांगून विद्यार्थिनींमध्ये जागरूकता निर्माण केली. विद्यार्थिनींनी उत्साहाने सहभाग घेत प्रश्न विचारून शंका निरसन केले. या कार्यशाळेमुळे विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वास वाढून निर्भयपणे जीवन जगण्याची प्रेरणा मिळाली,
असे मत कार्यक्रमाच्या अध्यक्ष कविताताई पवार यांनी व्यक्त केले.कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे अध्यक्ष संदिपान पवार, सचिव परेश घोडे, निमगाव सावाचे माजी उपसरपंच नजीर भाई चौगुले, सामाजिक कार्यकर्ते आणि माजी तंटामुक्ती अध्यक्ष परशुराम लगड, सामाजिक कार्यकर्त्यां स्नेहा बांगर,
संस्थेच्या प्रतिनिधी कविता पवार, प्राचार्य प्रल्हाद शिंदे,सर्व प्राध्यापक आणि प्राध्यापकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यशाळेचे सूत्रसंचालन प्रा.निलम गायकवाड यांनी केले व प्रा. सुभाष घोडे यांनी आभार मानले.
