वडगाव आनंद येथे किरकोळ वादातून विद्यार्थांचा चाकूहल्ला; खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल

1 min read

वडगाव आनंद दि.२८:- वडगाव आनंद (तालुका.जुन्नर) येथे किरकोळ वादातून नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने त्याच शाळेतील दोन विद्यार्थ्यांवर चाकूने हल्ला केल्याची धक्का दायक घटना बुधवारी (दि.२५) दुपारी विद्यालयाच्या आवारात घडली. या प्रकरणी आळेफाटा पोलिस ठाणे येथे अल्पवयीन आरोपीविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.श्रीमती रेवूबाई बाळाजी देवकर विद्यालय येथे नववीतील एका विद्यार्थ्याचा त्याच शाळेतील दुसऱ्या विद्यार्थ्यासोबत वाद सुरू होता. भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांवर आरोपीने चाकूने हल्ला केला. मानेवर, पाठीवर व डोक्यावर वार करण्यात आल्याने दोघेही विद्यार्थी गंभीर दोन जखमी झाले असून त्यांच्यावर आळेफाटा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पार्थ मारुती यादव (वय १४) हा शाळेतील सुट्टीदरम्यान शौचालयाजवळ उभा असताना संबंधित विद्यार्थ्यांमध्ये भांडण सुरू होते. ते सोडविण्यासाठी आयुष गणेश वाळुंज पुढे गेला असता आरोपीने त्याच्यावर वार केले. त्यानंतर पार्थ यादव हा आयुषला वाचविण्यासाठी पुढे सरसावला असता त्याच्यावरही चाकूने हल्ला करण्यात आला, असे फिर्यादीत नमूद आहे. जखमी विद्यार्थी सध्या उपचाराधीन असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!