बोटा येथे दोन दिवसीय राष्ट्रीय परिषद उत्साहात संपन्न

1 min read

बोटा दि.२६:- विद्या निकेतन इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी अँड रिसर्च सेंटर बोटा (ता.संगमनेर) यांच्या वतीने “आर्टिफिशि यल इंटेलिजेंस व नियामक अनुपालन : फार्मास्युटिकल आणि हेल्थकेअर इंडस्ट्रीतील परिवर्तन” या समकालीन विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. औषधनिर्माण व आरोग्य क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) मुळे होत असलेल्या बदलांचा तसेच नियामक अनुपालन प्रक्रियेतील डिजिटल परिवर्तनाचा सर्वांगीण आढावा या परिषदेत घेण्यात आला. देशभरातील प्राध्यापक, संशोधक, उद्योगतज्ज्ञ आणि विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.परिषदेच्या उद्घाटन सोहळ्यास विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे येथील फार्मसी विभागाचे अधिष्ठाता डॉ. विशाल पांडे, संदीप विद्यापीठ, नाशिक येथील सहयोगी प्राध्यापक डॉ. सुमित देवरे,डॉ. संदीप हापसे, डॉ. सतीश पोलशेट्टीवार, विलास सावंत, डॉ. अविनाश ठाणगे व डॉ. अक्षय खैरनार यांनी मार्गदर्शन केले.मान्यवरांनी AI आधारित नियामक अनुपालन, डेटा इंटिग्रिटी, ऑटोमेशन, रिस्क-बेस्ड मॉनिटरिंग आणि डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन या विषयांवर सखोल विवेचन केले. औषध उद्योगातील बदलत्या तंत्रज्ञानामुळे संशोधन, गुणवत्ता हमी व नियामक प्रक्रियेत नव्या संधी उपलब्ध होत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.परिषदेच्या दुसऱ्या दिवशी तांत्रिक सत्रे, संशोधनाधारित व्याख्याने, शोधनिबंध सादरीकरण व पोस्टर प्रेझेंटेशन आयोजित करण्यात आले. शोधनिबंध व पोस्टर सादरीकरणासाठी डॉ. विजयकुमार वाकळे, डॉ. तुषार डुकरे, डॉ. शीतल गोसावी यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. त्यांनी विद्यार्थ्यांच्या संशोधन कार्याचे शास्त्रीय मूल्य, नावीन्यपूर्णता व सादरीकरण कौशल्य यांच्या आधारे सखोल परीक्षण केले. उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या विद्यार्थ्यांना संस्थेचे सल्लागार बी. जी. शेखर पाटील, सचिव रामदास पोखरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विद्युलता शेखर पाटील, समन्वयक डॉ. आदित्य शेखर पाटील तसेच कॅम्पस डायरेक्टर दीपक रहाणे यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली.परिषदेच्या यशस्वी आयोजनामागे प्राचार्य डॉ. किरण शिंदे व संपूर्ण शिक्षकवृंद यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. ही परिषद शैक्षणिक व औद्योगिक क्षेत्रातील दुवा अधिक बळकट करणारी ठरली असून, औषधनिर्माण व आरोग्य क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्तेच्या प्रभावी वापराला नवी दिशा देणारी ठरली. विद्यार्थ्यांनी परिषदेमुळे संशोधनाची प्रेरणा व उद्योगातील आधुनिक प्रवाहांची सखोल माहिती मिळाल्याची भावना व्यक्त केली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!