एमआयटी-डब्ल्यूपीयूच्या १५ व्या भारतीय छात्र संसदेत पुण्याची ऐश्वर्या पुरी हिची दमदार भूमिका
1 min read
पुणे दि.२५:-एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी (MIT-WPU), पुणे येथे आयोजित १५व्या भारतीय छात्र संसदेमधील “द भारत कोलोक्वियम” या विशेष सत्रात महाराष्ट्राची कन्या ऐश्वर्या आशा उदयानंद पुरी (मूळ गाव – आळेफाटा, ता. जुन्नर) हिने “Reservation beyond 50 percent undermines the Constitution”
या विषयावर आपले अभ्यासपूर्ण, तर्कसंगत आणि परखड विचार प्रभावीपणे मांडले. देशभरातून उपस्थित असलेल्या विचारवंत, शासक, पत्रकार आणि लाखो विद्यार्थ्यांसमोर केलेल्या या प्रभावी मांडणीमुळे जुन्नरच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
ऐश्वर्याने आपल्या भाषणात आरक्षणाच्या घटनात्मक मर्यादा, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयांचा संदर्भ, तसेच सामाजिक न्याय आणि घटनात्मक संतुलन यांचा सखोल ऊहापोह केला. ५० टक्क्यांपलीकडे जाणारे आरक्षण संविधानाच्या मूलभूत तत्त्वांना बाधा पोहोचवू शकते, असा मुद्दा मांडताना तिने समता,
न्याय आणि प्रतिनिधित्व या मूल्यांचा संतुलित विचार मांडला. तिच्या भाषणाला उपस्थितांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.भारतीय छात्र संसद हे व्यासपीठ देशभरातील युवकांना राष्ट्रीय राजकारणात प्रत्यक्ष सहभागाची संधी उपलब्ध करून देणारे एक अत्यंत सन्माननीय आणि प्रेरणादायी व्यासपीठ म्हणून ओळखले जाते.
या व्यासपीठावर माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्यापासून ते रामनाथ कोविंद यांच्यापर्यंत अनेक मान्यवरांनी तरुणांना नेतृत्वाचे दिशादर्शन केले आहे.यंदाच्या अधिवेशनात केंद्रीय मंत्री अनुराग सिंह ठाकूर, शाहीद सिद्दीकी,डॉ. संदीप पाठक, ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई, विजेंद्र गुप्ता, दिग्विजय सिंह तसेच दूरदर्शी शिक्षणतज्ज्ञ राहुल कराड यांसह अनेक मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
ऐश्वर्याच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे आळेफाटा व जुन्नर परिसरात अभिमानाची भावना व्यक्त होत असून, युवकांनी सार्वजनिक जीवनात अभ्यासपूर्ण आणि जबाबदार भूमिका घ्यावी, असा प्रेरणादायी संदेश या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.
