व्ही. जे. इंटरनॅशनल स्कूल मध्ये शिवजयंती उत्सव जल्लोषात संपन्न
1 min read
वडगाव कांदळी दि.२०:-विशाल जुन्नर सेवा मंडळ संचलित व्ही. जे. इंटरनॅशनल स्कूल, नगदवाडी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त भव्य, दिमाखदार व प्रेरणादायी कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य, पराक्रम व राष्ट्रप्रेमाच्या तेजस्वी स्मृतींना उजाळा देणारा हा सोहळा विद्यार्थ्यांच्या कलात्मक सादरीकरणांनी अधिकच अविस्मरणीय ठरला.
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माधुरी निलख नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्या जुन्नर यांची विशेष उपस्थिती लाभली.तसेच मंगला बांगर या देखील कार्यक्रमास उपस्थित होत्या. पालक- शिक्षक संघाचे उपाध्यक्ष किशोर काकडे, सदस्य सचिन बढे, विशाल जुन्नर सेवा मंडळाचे अध्यक्ष अंकुश सोनवणे, खजिनदार शिवाजी बांगर, विश्वस्त विक्रांत काळे, सी.ई.ओ दुष्यंत गायकवाड यांची देखील उपस्थिती लाभली.
तसेच कार्यक्रमासाठी स्वप्निल गुंजाळ – लेखापरीक्षक -विशाल जुन्नर सेवा मंडळ यांनीही आपली उपस्थिती दर्शविली.कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या स्वागताने झाली. त्यानंतर दीपप्रज्वलन व उद्घाटन समारंभ पार पडला. प्रमुख पाहुण्यांना व्यासपीठावर सन्मानपूर्वक निमंत्रित करून कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर करण्यात आले. स्वागत गीताच्या मंगलमय स्वरांनी वातावरण भक्तिमय झाले.
यानंतर प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून त्यांचा शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. इयत्ता सातवी मधील विद्यार्थिनी माही देवळालीकर व इयत्ता पाचवी मधील विद्यार्थिनी कनक सोनवणे यांनी शिवचरित्रावरील माहितीपर भाषण प्रभावी शब्दांत सादर करून उपस्थितांची दाद मिळवली.विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या शिवकालीन प्रसंगावर आधारित नाटिकेने उपस्थितांना इतिहासाच्या सुवर्णकाळात नेले.
शिवगीताच्या जोशपूर्ण सादरीकरणाने सर्वत्र शिवभक्तीचा उत्साह उसळला. पारंपरिक लाठी-काठी प्रात्यक्षिकाने शौर्य आणि कौशल्याचा प्रत्यय दिला. त्यानंतर इयत्ता सातवी मधील ऋग्वेद आतकरी या विद्यार्थ्याने आपल्या गायन समूहासह सादर केलेल्या पोवाड्याने छत्रपतींच्या पराक्रमाची गाथा जिवंत केली. लेझीम व ढोल-ताशांच्या गजरात संपूर्ण परिसर दणाणून गेला व वातावरणात उत्साहाचे चैतन्य भरून राहिले.
प्रमुख पाहुण्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे आदर्श जीवन, धैर्य, नेतृत्वगुण, शिस्त आणि राष्ट्रनिष्ठा आत्मसात करण्याचा प्रेरणादायी संदेश दिला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता आठवी मधील विद्यार्थिनी देविका बढे व इयत्ता सातवी मधील विद्यार्थिनी प्रणिती आहेर यांनी अत्यंत आत्मविश्वास पूर्ण शैलीत केले.
तसेच मान्यवरांचे स्वागत व सत्कार समारंभ यासाठीचे सूत्रसंचालन शिक्षिका मानसी पाचपुते व मनिषा हांडे यांनी आकर्षक भाषाशैलीत केले,तर आभार प्रदर्शन शिक्षिका माधुरी देव्हारे यांनी केले.संपूर्ण कार्यक्रमासाठी आकर्षक सजावट, फलकलेखन व सादरीकरणांची देखणी मांडणी करण्यात आली होती.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षकवृंद, क्रीडा शिक्षक, कलाशिक्षक, संगीत शिक्षक,विषय शिक्षक, वर्गशिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांनीही शिस्त, मेहनत व समर्पणाच्या जोरावर कार्यक्रमाची शोभा वाढवली.
शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री तांगतोडे यांच्या कुशल, दूरदृष्टीपूर्ण व प्रेरणादायी मार्गदर्शनामुळे कार्यक्रमाला विशेष यश प्राप्त झाले. समन्वयिका जयश्री कुंजीर व श्वेता कोकणे यांचेही सहकार्य लाभले.सर्वाचे सहकार्य व प्रोत्साहनामुळे शिवजयंती उत्सव खऱ्या अर्थाने दिमाखदार आणि संस्मरणीय ठरला.
