राज्यात शिवजयंतीचा उत्साह; शिवनेरीवरील कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवारही उपस्थित
1 min read
पुणे दि.१९:- महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांची आज ३९६ वी जयंती आहे. महाराष्ट्रासह देशभरात विविध ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम आणि मिरवणुकीचे आयोजन करण्यात आलं आहे. शिवजयंतीनिमित्त किल्ले शिवनेरीवर आकर्षक अशी सजावट करण्यात आली आहे.
तर शिवजन्म स्थळाच्या आतील भागातही सजावट करण्यात आली आहे.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जन्मस्थळावर नतमस्तक होण्यासाठी राज्यातून अनेक शिवभक्त किल्ले शिवनेरीवर दाखल झाले. शिवनेरीवरील शासकीय कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पर्यटनमंत्री शंभुराज देसाई, सांस्कृतिक मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्यासह विविध मान्यवर शिवनेरीवर उपस्थित राहणार आहेत. अकोला जिल्ह्यातील अकोटमध्ये शिवजयंतीनिमित्त एक भव्य आणि अनोखा उपक्रम पाहायला मिळाला आहे.
अकोटमधील श्री. शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाने ही भव्य रांगोळी साकारली. तब्बल 30 हजार स्क्वेअर फुटांमध्ये रांगोळी काढण्यात आलीय. यामध्ये सिंहासनावर विराजमान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांची आकर्षक प्रतिमा साकारण्यात
आलीये… विशेष म्हणजे अवघ्या 15 विद्यार्थ्यांनी 6 दिवसांच्या अथक परिश्रमातून ही कलाकृती उभी केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त लातूर शहरात मध्यरात्री शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात पार पडला.
छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने शिवाजी महाराज चौक येथे रात्री बारा वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
