“सह्याद्री व्हॅली महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष शिबिर उत्साहात सुरू”

1 min read

आळे दि.१३:- आळे ता.जुन्नर राष्ट्रीय सेवा योजना ही विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होण्यासाठी महत्त्वपूर्ण असे शिबिर आहे यामधून श्रम संस्कार केले जातात. या उपक्रमाचे उद्दिष्ट म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीयत्वाची जाणीव निर्माण करणे, सामाजिक कार्याचा सराव व्हावा यासाठी हा शासनाचा महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. आजचा नवयुवक अशा शिबिरातून घडतो त्यामुळे युवकांनी मोठ्या प्रमाणामध्ये शिबिरामध्ये सहभाग नोंदवला पाहिजे असे आव्हान राष्ट्रीय सेवा योजनेचे मा. जिल्हा समन्वयक प्राध्यापक डॉ. श्रीकांत फुलसुंदर यांनी केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि सह्याद्री व्हॅली कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रमसंस्कार शिबिर “शाश्वत विकासासाठी युवक: पाणलोट आणि पडीक जमिनी व्यवस्थापन” या शीर्षकाखाली श्री ज्ञानेश्वर महाराज देवस्थान ट्रस्ट(संस्था) आळे येथे उत्साहात सुरू झाले. या शिबिराचे उद्घाटन श्री ज्ञानेश्वर महाराज देवस्थान ट्रस्टचे सचिव आणि मा. पंचायत समिती सदस्य जीवन शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी सह्याद्री व्हॅली कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी चे खजिनदार सचिन चव्हाण, महाविद्यालयाचे उपप्राचार्य पी. बालारामडू, प्रसिद्ध उद्योजक पप्पू डोंगरे, पवन डोके आणि झेड. पी. स्कूल कोळवाडीचे मुख्याध्यापक उदय पुरी, प्रा. किरण फटांगरे, प्रा.श्रद्धा दाते, प्रा. तेजश्री मते, प्रा. विनया वाघोले या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते. या शिबिरामध्ये एकूण 50 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या शिबिरामध्ये गाव पातळीवर विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. त्यामध्ये ग्रामस्वच्छता, वृक्षारोपण, आरोग्य शिबिर, पथनाट्य सादरीकरण तसेच विविध विषयावरील व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी उद्धव भारती यांनी दिली. हे शिबिर पुढील सात दिवस सुरू राहणार आहे असेही त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे उपप्राचार्य पी. बालारामडू यांनी केले तर आभार एन.एस.एस.चे कार्यक्रम अधिकारी उद्धव भारती यांनी मानले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!