राज्यात जिल्हा परिषद निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष
1 min read
मुंबई दि.१०:- राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणात पुन्हा एकदा भाजपने वर्चस्व गाजवलं आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे निकाल जाहीर होताच सत्तेचा कल कुणाकडे आहे, हे स्पष्ट झाले आहे. ग्रामीण भागातही भाजपने आपली ताकद अबाधित ठेवत सर्वाधिक जागा पटकावल्या असून
राज्यातील जनतेचा विश्वास अजूनही आपल्याच बाजूने असल्याचे भाजपने सिद्ध केले आहे.या निवडणुकांमध्ये भाजपने महायुतीतील सहकारी पक्षांसह महाविकास आघाडीतील घटक पक्षांपेक्षा अधिक जागा जिंकत आघाडी घेतली आहे.
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती स्तरावर मिळालेल्या या यशामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची जोडी सध्या राज्याच्या राजकारणात सर्वाधिक प्रभावी ठरत असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि रविंद्र चव्हाण यांच्या काटेकोर नियोजनातून भाजपने सलग 3 निवडणुकां मध्ये वर्चस्व राखण्याची कामगिरी केली आहे. नोव्हेंबर महिन्यात झालेल्या नगर परिषद निवडणुका, त्यानंतर जानेवारीमध्ये पार पडलेल्या महानगरपालिका निवडणुका आणि आता फेब्रुवारीमधील
जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये भाजपने सर्वाधिक जागा मिळवून राजकीय हॅटट्रिक साधली आहे.या यशामागे देवेंद्र-रविंद्र या जोडगोळीची अचूक निवडणूक रणनीती, प्रभावी प्रचार यंत्रणा, स्थानिक नेतृत्वाशी थेट संवाद आणि राज्य पातळीवरील निर्णयक्षम नेतृत्व यांचा समन्वय महत्त्वाचा ठरला.
पक्षाच्या शीर्ष नेतृत्वाचा वरदहस्त स्थानिक पातळीपर्यंत पोहोचल्याने कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला,तर शिस्तबद्ध कामकाजामुळे संघटनात्मक ताकद अधिक भक्कम झाली. याचाच परिणाम म्हणून अनेक ठिकाणी भाजपने अनपेक्षित आणि धक्कादायक विजय नोंदवले.
देवेंद्र फडणवीस यांचा ठाम पाठिंबा आणि रविंद्र चव्हाण यांचे संघटन कौशल्य या संगमामुळे भाजपची यंत्रणा अधिक प्रभावी झाली आहे. जिल्हा परिषद निवडणुकांमधील निकाल हे केवळ आकड्यांचे यश नसून राज्यातील राजकीय दिशा ठरवणारा महत्त्वाचा संदेश मानला जात आहे. ग्रामीण ते शहरी भागापर्यंत भाजपची पकड कायम असल्याचे या निकालांतून स्पष्टपणे समोर आले आहे.
