राज्यस्तरीय फार्मा मॉडेल मेकिंग स्पर्धेत विशाल जुन्नरच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश
1 min read
आळे दि.३:- सिताबाई थिटे कॉलेज ऑफ फार्मसी, शिरूर येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय फार्मा मॉडेल मेकिंग स्पर्धेत आळे येथील विशाल जुन्नर सेवा मंडळ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी व विशाल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च येथील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट सादरीकरण करत प्रथम क्रमांक पटकावून संस्थेचा नावलौकिक वाढविला.
या स्पर्धेत राज्यभरातील ३८ फार्मसी महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. आधुनिक औषध वितरण प्रणाली, स्मार्ट ड्रग डिलिव्हरी, नियंत्रित औषध मुक्तता प्रणाली, बायोटेक्नॉलॉजी तसेच फार्मास्युटिकल उपकरणांवर आधारित विविध नाविन्यपूर्ण व संशोधना भिमुख मॉडेल्स विद्यार्थ्यांनी सादर केली.
डी. फार्मसी (D.Pharmacy) कॅटेगरीत विशाल जुन्नर सेवा मंडळ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी,आळे येथील तनय चव्हाण व श्रद्धा चौधरी यांनी सादर केलेल्या मॉडेलला परीक्षकांकडून विशेष पसंती मिळाली. त्यांच्या मॉडेलची संकल्पना, सादरीकरण, वैज्ञानिक दृष्टिकोन व व्यावहारिक उपयुक्तता लक्षात घेऊन त्यांना प्रथम क्रमांक बहाल करण्यात आला.
तसेच बी. फार्मसी (B.Pharmacy) कॅटेगरीत विशाल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च, आळे येथील ओम खैरे व केतकी गोमसे यांनी सादर केलेल्या नाविन्यपूर्ण मॉडेलने उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले. त्यांच्या उत्कृष्ट सादरीकरणामुळे त्यांनीही स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला.
स्पर्धेतील सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचा प्रशस्तिपत्रक, ट्रॉफी व रोख पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला. परीक्षकांनी विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेचे व संशोधनात्मक विचारसरणीचे विशेष कौतुक केले. अशा स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांमध्ये व्यावहारिक ज्ञान,नवकल्पना व आत्मविश्वास वाढीस लागतो, असे मत त्यांनी व्यक्त केले.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अंकुश सोनावणे, सीईओ डॉ. डी.डी.गायकवाड,प्राचार्य डॉ. एस. एल. जाधव (बी.फार्मसी) व प्राचार्य डॉ. आर. ए. हांडे (डी. फार्मसी) यांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
विद्यार्थ्यांच्या या घवघवीत यशामुळे संस्थेची शैक्षणिक गुणवत्ता व संशोधनाभिमुख कार्य अधोरेखित झाले असून आळे परिसरात संस्थेचा नावलौकिक वाढल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
