व्ही.जे. इंटरनॅशनल स्कूल येथे भव्य आंतरशालेय दोरी- उडी स्पर्धा संपन्न
1 min read
वडगाव कांदळी दि.३:- विशाल जुन्नर सेवा मंडळ संचलित व्ही. जे. इंटरनॅशनल स्कूल, नगदवाडी- कांदळी तसेच जुन्नर तालुका क्रीडा संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य आंतर-शालेय दोरी उडी (Rope Skipping) स्पर्धा २०२६ उत्साहपूर्ण आणि खेळभावनेच्या वातावरणात पार पडली.
विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक तंदुरुस्ती, एकाग्रता, सहनशक्ती, शिस्त व निरोगी स्पर्धात्मक वृत्ती विकसित व्हावी, या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत परिसरातील विविध शाळांमधील एकूण १०५ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.या क्रीडा उपक्रमास विशाल जुन्नर
सेवा मंडळाचे अध्यक्ष अंकुश सोनवणे हे मुख्य पाहुणे उपस्थित होते. त्यांच्यासोबत मंडळाचे विश्वस्त विक्रांत काळे, सी.ई.ओ दुष्यंत गायकवाड,पी.टी.ए. उपाध्यक्ष किशोर काकडे, पी.टी.ए. सदस्य सचिन बढे, सहभागी शाळांचे क्रीडा शिक्षक, पालकवर्ग व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात समर्थ गुरुकुल, बेल्हे येथे कार्यरत असलेले क्रीडा शिक्षक तसेच गुरुवर्य रा.प.स सबनीस विद्या मंदिर, नारायणगावचे माजी उपप्राचार्य हरिश्चंद्र नरसोडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना “दोरी उडी हा केवळ खेळ नसून उत्तम आरोग्य,
फुफ्फुसांची क्षमता वाढवणारा व संपूर्ण शरीरासाठी लाभदायक असा व्यायाम आहे” असे सांगून विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले.या स्पर्धेचे उत्कृष्ट नियोजन व अंमलबजावणी शाळेचे क्रीडा शिक्षक अमेय देशमुख,अशोक हाके,किशोर काकडे व महेंद्र गुळवे यांच्या अथक परिश्रमातून यशस्वीरीत्या पार पडली.
विविध वयोगटांतील स्पर्धा वेळेच्या काटेकोर नियोजनाने घेण्यात आल्या.स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना ट्रॉफी, पदके व आकर्षक भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. बक्षीस वितरण क्रीडा शिक्षक, व्ही. जे. इंटरनॅशनल स्कूलचे शिक्षक, उपस्थित पालकवर्ग व पी.टी.ए. उपाध्यक्ष यांच्या हस्ते करण्यात आले. सर्व सहभागी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देऊन प्रोत्साहन देण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे शिक्षक अमोल जाधव यांनी उत्साही व प्रभावी शैलीत केले, तर आभार प्रदर्शन शिक्षिका शितल वळसे यांनी केले.या संपूर्ण उपक्रमासाठी व्ही. जे. इंटरनॅशनल स्कूलच्या मुख्याध्यापिका जयश्री तांगतोडे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे स्पर्धा शिस्तबद्ध, प्रेरणादायी व संस्मरणीय ठरली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशाल जुन्नर सेवा मंडळाचे अध्यक्ष अंकुश सोनवणे तसेच सी.ई.ओ. दुष्यंत गायकवाड यांचे मोलाचे व उत्कृष्ट मार्गदर्शन लाभले.अशा प्रकारे प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित भव्य आंतर-शालेय दोरी उडी स्पर्धेतून क्रीडा महोत्सवाची सांगता उत्साह, आनंद व खेळभावनेच्या वातावरणात करण्यात आली.
