विशाल जुन्नर फार्मसी कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे सात दिवसीय विशेष श्रमसंस्कार शिबिर संपन्न
1 min read
आळे दि.४:- विशाल जुन्नर सेवा मंडळाच्या विशाल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मासिटिकल एज्युकेशन अँड रिसर्च, आळे (ता. जुन्नर) येथील रासेयो युनिट (BSF-103) यांच्या वतीने पिंपळवंडी येथे आयोजित सातदिवसीय विशेष श्रमसंस्कार शिबिर विविध समाजोपयोगी व पर्यावरणपूरक उपक्रमांनी यशस्वीरीत्या संपन्न झाले.

या शिबिरादरम्यान रासेयो स्वयंसेवकांनी मळगंगा माता मंदिर, स्मशानभूमी घाट तसेच श्री पिंपळेश्वर महादेव मंदिर परिसराची स्वच्छता करून प्लास्टिक व इतर कचऱ्याचे संकलन केले. तसेच प्रभात फेरी काढून घोषणा व फलकांच्या माध्यमातून प्लास्टिकमुक्ती, पर्यावरण संरक्षण व सामाजिक स्वच्छतेचे महत्त्व ग्रामस्थांपर्यंत पोहोचविण्यात आले.

शिबिराच्या कालावधीत पिंपळवंडी येथील सुभाष विद्या मंदिरामध्ये आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात ९५ शालेय विद्यार्थ्यांची ब्लड ग्रुप, हिमोग्लोबिन व बीएमआय तपासणी करून त्यांना आरोग्यविषयक मार्गदर्शन देण्यात आले. यासोबतच गावातील घरोघरी भेटी देऊन औषधांचा योग्य वापर, साठवणूक व संभाव्य दुष्परिणामांविषयी जनजागृती करण्यात आली.

या विशेष श्रमसंस्कार शिबिराचा उद्घाटन समारंभ अध्यक्ष अंकुश सोनवणे (अध्यक्ष, विशाल जुन्नर सेवा मंडळ) यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी लक्ष्मण कोरडे व विक्रांत काळे (विश्वस्त, विशाल जुन्नर सेवा मंडळ), यांची विशेष उपस्थिती होती. प्रमुख पाहुणे म्हणून टी.आर वामन (अध्यक्ष वसंतराव नाईक पतसंस्था), ऋषिकेश फुलसुंदर (अध्यक्ष, श्री प्रगती नागरी सहकारी पतपेढी, नारायणगाव),
बंटी बोरकर (उपाध्यक्ष, श्री प्रगती नागरी सहकारी पतपेढी, नारायणगाव), सबाजी लेंडे (ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, पिंपळवंडी), संजय भुजबळ (अध्यक्ष शेतकरी संघटना) तसेच पिराजी टाकळकर (तंटामुक्ती अध्यक्ष, पिंपळवंडी) उपस्थित होते. शिबिराच्या समारोप समारंभास विशाल जुन्नर सेवा मंडळाचे खजिनदार शिवाजी बांगर हे अध्यक्ष म्हणून लाभले, तर शरद लेंडे (मा. उपाध्यक्ष, जिल्हा परिषद, पुणे), महादू वाघ (अध्यक्ष, यशवंत पतसंस्था, पिंपळवंडी), अशोक सोनवणे (अध्यक्ष, विशाल जुन्नर प्रतिष्ठान),
सत्यवान काकडे (मा. ग्रा. पं. सदस्य, पिंपळवंडी) यांची विशेष उपस्थिती लाभली तदप्रसंगी विक्रांत काळे, महेंद्र शिंदे हे संस्थेचे विश्वस्त, संस्थेचे ज्येष्ठ सभासद सुंदर शिंदे, अनंथा सोनवणे देखील उपस्थित होते. यावेळी राष्ट्रीय सेवा योजना उपक्रमांचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात आले.
या सातदिवसीय शिबिरा दरम्यान शरद लेंडे (माजी उपाध्यक्ष, जिल्हा परिषद पुणे), संस्थेचे माजी अध्यक्ष अशोक सोनवणे, विश्वस्त चंद्रकांत सोनवणे, सीईओ डॉ. डी. डी. गायकवाड, प्राचार्य डॉ. एस. एल. जाधव यांनी
शिबिराला भेट देऊन स्वयंसेवकांच्या कार्याचे कौतुक केले.
कार्यक्रम अधिकारी रवी गवारे यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमोद राहींज यांच्या सहकार्याने रासेयो स्वयंसेवकांनी सर्व उपक्रम शिस्तबद्ध व नियोजनबद्धरीत्या राबवून पर्यावरण संवर्धन, आरोग्य जागरूकता व सामाजिक बांधिलकीचा आदर्श निर्माण केला.

