आई-वडिलांचा कृतज्ञता सोहळा समाजासाठी प्रेरणादायी
1 min read
जुन्नर दि.३:- वामन मारुती काफरे यांच्या 65 व्या वाढदिवसानिमित्त आयोजित मातृ-पितृ कृतज्ञता सोहळा मोठ्या दिमाखात मु. पो. बल्लाळवाडी तालुका जुन्नर जिल्हा पुणे या ठिकाणी संपन्न झाला.या कार्यक्रमाच्या निमित्ताने ह भ प राजेंद्र महाराज सदगीर यांची कीर्तन सेवा झाली.
महाराजांनी नसावे ओशाळ | मग मानिती सकळ||
जाय तेथे पावे मान |चाले बोलिले वचन ||तुकारामांच्या गाथेतील या अभंगाचा विस्तृत मतितार्थ आपल्या वाणीतून समाजापुढे ठेवला. अभिष्टचिंतन सोहळ्याच्या शुभेच्छा देताना बल्लाळवाडी गावचे प्रथम नागरिक सरपंच संजय नायकोडी यांनी काफरे कुटुंबाबद्दल माहिती दिली.
वामन मारुती काफरे व मंगल वामन काफरे यांचे हे बल्लाळवाडी गावातील शेतकरी कुटुंब. पूर्वीची परिस्थिती खूप हलाखीची परंतु मोठ्या जिद्दीने तिन्ही मुले वाढवली, शिकवली, उच्चशिक्षित केली. मोठा मुलगा पवन वामन काफरे आर्मी मध्ये देशसेवा करत असून लहान मुलगा तुषार वामन काफरे शिक्षण क्षेत्रात विद्यार्थी घडवण्यासाठी योगदान देत आहे.
गावचे प्रा. एकनाथ डोंगरे यांनी शुभेच्छा देताना जुन्या काळातील आठवणींना उजाळा दिला. दीर्घायुष्याच्या शुभेच्छा देताना डॉ. गणपत डुंबरे यांनी आरोग्य, येणाऱ्या काळातील काफरे कुटुंबाकडून सांप्रदायिक शैक्षणिक सामाजिक योगदानसाठी अपेक्षा व्यक्त केल्या.
देखना दिमाखदार कृतज्ञता सोहळा हयातीत असताना पाहणे ही आई-वडिलांनी केलेल्या कष्टाची पावती आहे अशा शुभेच्छा पोपटराव भास्कर यांनी दिल्या.या सोहळ्याच्या निमित्ताने ज्ञानदान व अन्नदान काफरे कुटुंबातील भावंडांच्या हातून घडले अशी भावना वीर सावरकर विद्यालय, पांगरीमाथा चे मुख्याध्यापक संतोष झावरे यांनी आपल्या निवेदनात मांडली.
आई-वडिलांस देवा समान मानून त्यांच्या पोटी जन्म घेतल्याचा अभिमान सर्वांनी बाळगावा हा लाखमोलाचा संदेश या कृतज्ञता सोहळ्याच्या माध्यमातून समाजात जात असल्याचे मत ह.भ.प. विष्णू महाराज डोंगरे यांनी व्यक्त केले.आई-वडिलांचे औक्षण करत त्यांना भावी निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
